भाजपा ठोकणार काँग्रेसवर 500 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

bjp vr congress

मुंबई – नवी मुंबईतील सिडकोमध्ये भ्रष्ट्राचार केल्याचा काँग्रेसने केलेला आरोप भाजपाने फेटाळून लावला आहे. सिडकोमधील 1767 कोटी रुपये किमतीच्या 24 एकर जमिनीची अवघ्या तीन कोटी रुपयांना व्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसकडून भाजपावर करण्यात आला होता. याप्रकरणावरुन काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. आज भाजपाकडून पत्रकार परिषद घेत सर्व आरोपाचे खंडण करत काँग्रेसवर 500 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. उद्या सकाळी भाजपाकडून अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यात येणार आहे. भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी आणि आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषदेत घेतली.

Loading...

मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढले हा कोणताही घोटाळा केल्याचा पुरावा असू शकत नाही. माझी अनेक नेत्यांशी आणि बिल्डर्ससोबत मैत्री आहे असेही लाड यांनी म्हटले आहे. तसेच काँग्रेसच्या आरोपांमध्ये काहीही अर्थ नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसने नाहक माझी बदनामी केली आहे त्याचमुळे मी काँग्रेस विरोधात ५०० कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा करतो आहे असे लाड यांनी म्हटले आहे. माधव भंडारी आणि भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसचे सगळे आरोप फेटाळले आहेत.

काँग्रेसला टीकेसाठी कोणताही मुद्दा सापडत नाही, या सरकारचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरु आहे. त्याचमुळे काँग्रेने जमीन घोटाळ्याचे खुसपट काढले आहे. काँग्रेसने हा पोरकटपणा सोडून द्यावा आणि जनतेत जाऊन आपल्याला लोक का नाकारत आहेत याचे अत्मपरिक्षण करावे असा सल्लाही माधव भंडारी यांनी काँग्रेसला दिला. तसेच सगळे आरोप खोडून काढत त्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

काय आहेत काँग्रेसचे आरोप

नवी मुंबईत सिडकोच्या २४ एकर जागेबाबत मोठा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसने केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहमतीने हा हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यामध्ये मंत्रालयातील अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा हात असून त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सिडकोच्या ताब्यातील या जागेची किंमत बाजारभावाप्रमाणे १६०० कोटी रुपये इतकी आहे. मात्र, ती केवळ ३ कोटी रुपयांत बिल्डर मनिष भतिजा आणि संजय भालेराव यांना विकण्यात आल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. यातील बिल्डर भालेराव हे प्रसाद लाड यांचे खास दोस्त आहेत. प्रसाद लाड हे मुख्यमंत्र्यांचे व्यवसायिक सहकारी आहेत. त्यामुळे लाड यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांच्या संमतीने हा व्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.Loading…


Loading…

Loading...