ऐतिहासिक निर्णय : सौदी अरेबियात आजपासून महिला चालविणार गाड्या

टीम महाराष्ट्र देशा – सौदी अरेबियात राहणाऱ्या महिलांच्या दृष्टीनं २४ जून हा दिवस खऱ्या अर्थानं खास ठरला आहे. अनेक नियमांच्या रुढी, परंपरा, राग, द्वेषाच्या बंधनात अडकलेल्या महिलांना आजपासून गाडी चालवण्याची मुभा देण्यात आली आहे. अजून अनेक महत्त्वाचे बदल या देशात घडायचे आहेत. पण हे स्त्रियांच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीनं टाकलेलं पहिलं पाऊल समजलं जात आहे.

गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात सौदीचे किंग सलमान यांनी फर्मान काढून महिलांना वाहन चालविण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे हा निर्णय महिलांसाठी महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक ठरला होता. सौदीत महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेग-वेगळे कायदे आहेत. यामध्ये महिलांना वाहन चालवण्याची परवानगी दिली नव्हती. मात्र, किंग सलमान यांनी घेतल्याने निर्णयाचे जगभरातून स्वागत करण्यात आले होते. अमेरिकेनेही या निर्णयाचे स्वागत केले होते. सौदीतील महिलांना गाडी चालविण्यास परवानगी दिल्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. हा निर्णय देशाला योग्य दिशेला घेऊन जाणारा आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या एका प्रवक्त्याने म्हटले होते.

सौदी अरेबियात महिलांना ड्रायव्हिंगची का परवानगी नव्हती?

सौदीमध्ये सुन्नी मुस्लिम जास्त राहतात. ते पारंपरिक आहेत. तिथल्या कायद्याप्रमाणे महिला पती, भाऊ, पिता किंवा मुलगा यांनाच सोबत घेऊन बाहेर पडू शकतात. एकट्या नाही. मग अशा देशात महिला स्वत: कार चालवणं फार दूरची गोष्ट.सौदीचे राजपुत्र मोहम्मद बीन सलमान यांना देशाची छबी बदलायचीय. म्हणून बरेच कायदे बदलले जातायत.

महिला हक्क कार्यकर्ते सौदीत 1990 पासूनच या अधिकाराची मागणी करत होते. न्यायपालिका आणि शिक्षणाच्या क्षेत्रात हस्तक्षेप करणा-या काही मूलतत्ववादी मौलवींचा याला विरोध होता. महिलांना वाहन चालविण्याचा अधिकार दिल्यास समाज भ्रष्ट होईल आणि पापाचा जन्म होईल असे मौलवींचे म्हणणे होते.