नितीन आगे हत्या प्रकरण; न्याय मिळवून देण्यासाठी हायकोर्टात जाणार : आठवले

nitin aage murder

टीम महाराष्ट्र देशा : नितीन आगे हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली. नितीन आगेची हत्या तर झालीच आहे, मात्र साक्षीदार फुटल्यामुळे आरोपी सुटले, नितीन आगेला न्याय मिळवून देण्यासाठी हायकोर्टात  जाऊ, अशी माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.या निकालानंतर सर्व आरोपी सुटल्यामुळे सोशल मिडीयावर संताप व्यक्त केला जात आहे.आता हायकोर्टात तरी नितीनला न्याय मिळतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

काल अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने धक्कादायक निकाल देत राज्यभर गाजलेल्या खर्डा (ता. जामखेड) येथील नितीन राजू आगे या अल्पवयीन दलित मुलाचा खून केल्याच्या आरोपातून न्यायालयाने सर्व आरोपींची मुक्तता केली .या खटल्यात एकूण २६ साक्षीदार तपासण्यात आले, त्यातील १६ साक्षीदार फितूर म्हणून जाहीर करण्यात आले, त्यात काही प्रत्यक्षदर्शी तर काही शाळेतील शिक्षक होते, असे सरकारी वकील गवळी यांनी सांगितले.

नितीन राजू आगे या अल्पवयीन दलित मुलाच्या खुनाची घटना २८ एप्रिल २०१४ रोजी दुपारी १२ च्या सुमाराला घडली. यातील प्रमुख आरोपीच्या बहिणीचे व इयत्ता १२ वीत शिकणाऱ्या नितीन आगे या तरुणाचे प्रेमसंबंध होते, दोघे एकाच म्हणजे खर्डा येथील न्यू इंग्लिश शाळेत शिकत होते. मुलीने नितीनलाच आपला पती करायचे असे सांगितले होते. त्याचा राग येऊन वरील आरोपींनी नितीनला मारहाण करत त्याचा गळा आवळून खून केला व त्याने आत्महत्या केली, असा बनाव तयार करण्यासाठी मृतदेह जवळच्याच कानिफनाथाच्या डोंगरावरील झाडाला लटकवला, अशी फिर्याद त्याचे वडील राजू नामदेव आगे यांनी दिली होती.

या खटल्याचा निकाल गुरुवारी जिल्हा सत्र न्यायाधीश विवेक हुड यांनी दिला. सरकारतर्फे सरकारी वकील रामदास गवळी यांनी तर आरोपींच्या वतीने वकील माणिकराव मोरे, वकील महेश तवले व वकील प्रकाश गटणे यांनी काम पाहिले. सचिन ऊर्फ आबा हौसराव गोलेकर (२१), शेषराव रावसाहेब येवले (४२), नीलेश महादेव गोलेकर (२३), विनोद अभिमन्यु गटकळ (२३), राजकुमार शशिराव गोलेकर (२४), भुजंग सुर्भान गोलेकर (४०), सिद्धेश्वर विलास गोलेकर (२३), संदीप तुकाराम शिकारे (२४), विशाल हरिभाऊ ढगे (१९) व साईनाथ रावसाहेब येवले (४२) या आरोपींची खटल्यातून मुक्तता करण्यात आली. या खटल्यात एकूण १३ आरोपी होते. त्यातील तीन अल्पवयीन होते तर एक आरोपी साईनाथ येवले याचा खटला सुरू असतानाच मृत्यू झाला.