तुळजाभवानी मंदिर परिसर बालभिक्षेकरींंच्या त्रासाने त्रस्त

तुळजापूर – तुळजाभवानी देवीच्या मंदिर परिसरामध्ये सर्व वयोगटातील मुले-मुली बायका-पुरुष भाविक भक्तांचे दर्शन झाल्यानंतर त्यांचे हात पकडून कपडे पकडून भीक मागतात. ही मुले भिक दिल्याशिवाय त्यांच्यापासून दूर जात नाहीत या प्रकारामुळे भाविक भक्तांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचं चित्र आहे. या सर्व प्रकारामुळे भावनिक होऊन हे भक्त नाराज होतात हा प्रकार गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे.

दरम्यान,भाविकांना होणारा त्रास लक्षात घेऊन संजय बोंदर यांनी या प्रश्नांमध्ये लक्ष घालून तुळजाभवानी मंदिर समिती, तुळजापूर पोलीस स्टेशन, तुळजापूर नगरपरिषद, उस्मानाबाद जिल्हा महिला व बालकल्याण विभाग तसेच राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे यांच्याकडे तक्रार केल्या आहेत.

गेल्या सहा महिन्यांंपासून याविषयी या खात्याअंतर्गत परस्परांना पत्रव्यवहार करून कारवाई चे आदेश देण्यात आले. परंतु प्रत्यक्ष कारवाई करण्यासाठी मात्र कोणताही विभाग पुढे आलेला दिसत नाही. या अंतर्गत जबाबदारी असणारे अधिकारी आणि त्यांचे प्रशासन सदर जबाबदारी आमच्या खात्याची नसल्याचे सांगून कारवाई करण्यापासून दूर जात आहेत. मूळ प्रश्न या भिकारी मुले-मुली यांना या कामापासून दूर करून त्यांच्या शैक्षणिक आणि कौटुंबिक प्रगतीसाठी हातभार लावण्याची तरतुद असताना कायद्यातील तरतुदी पुढे करून प्रशासनातील मंडळी ही उपाययोजना करत नसल्याचं चित्र आहे.

स्थानिक पातळीवर या मुलांना या कामापासून दूर नेण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले मात्र त्यांचा या भिकाऱ्यांंवरती कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. दिवसेंदिवस हा प्रकार वाढत चालला असून राज्य सरकारने यावर त्वरित कारवाई न केल्यास त्याचे विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

2 Comments

Click here to post a comment