शहिदांच्या पत्नीला, कायदेशीर वारसांना मिळणार शेती योग्य जमीन 

मुंबई : शहीद सैनिकांच्या पत्नीला दोन हेक्टर शेतीयोग्य जमीन देण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाला आणखी व्यापक करून आता भारतीय सैन्यासह सशस्त्र दलातील शहीद सैनिकांच्या पत्नी अथवा कायदेशीर वारसालाही अशा स्वरूपाचा लाभ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी घेतला आहे. शहिदाची पत्नी हयात नसल्यास कायदेशीर वारसास लाभ मिळणार आहे.

या जमिनीचे वाटप भोगाधिकार मूल्यरहित (ऑक्युपन्सी मूल्य न आकारता) आणि विनालिलाव देण्याची तरतूद करण्यात आली आहे. हा निर्णय प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी शासकीय जमीन वाटपासंदर्भातील 1971 च्या नियमात बदल करणे आवश्यक आहे. त्या बदलांना आज मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. हा निर्णय भारतीय सैन्यदल किंवा सशस्त्र दलांसाठीही लागू असेल. ही जमीन प्रदान करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतील.

यामुळे आता भारतीय सैन्य अथवा कुठल्याही सशस्त्र दलातील शहीद सैनिक अथवा अधिकाऱ्यांच्या पत्नीला किंवा वारसाला दोन हेक्टर जमीन मिळू शकणार आहे. तसेच ही जमीन देताना कुठल्याही प्रकारचे मूल्य आकारले जाणार नाही.

You might also like
Comments
Loading...