रमेश कराडांच्या माघारीची सूत्रे पुण्यातून हलली ?

pankajaa munde vr ramesh karad

टीम महाराष्ट्र देशा- सध्या राज्यभर बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकी दरम्यान सुरु असलेली राजकीय उलथापालथ चर्चेत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर तोडपाणी करण्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश कराड यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतली. तोडपाणी करणाऱ्या नेत्यांबद्दल काय बोलणार? मी योग्य वेळी माझी भूमिका स्पष्ट करेन असं रमेश कराड यांनी स्पष्ट केलं आहे. भाजपमधून आलेल्या कराड यांना पक्षात प्रवेश देत थेट उमेदवारी मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावलेल्या धनंजय मुंडे यांना या खेळीद्वारे पंकजा मुंडे यांनी जोरदार झटका दिल्याचे बोलले जात आहे.

एखाद्या राजकीय पक्षाचा अधिकृत उमेदवार ऐनवेळी माघार कसा घेतो आणि पंकजा मुंडे यांनी हे शक्य कसं झालंयाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेल्या या धोबीपछाडाचे श्रेय जरी पंकजा मुंडेंना दिले जात असले तरी पुण्यातील एमआयटी शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा विश्वनाथ कराड यांनी पंकजा मुंडेंच्या वतीने केलेली मध्यस्थी रमेश कराड यांच्या ऐनवेळच्या माघारीसाठी कारणीभूत ठरल्याची चर्चा सुरु आहे.

दैनिक दिव्य मराठीने यासंदर्भातील वृत्त दिलेल्या वृत्तानुसार , रमेश कराड यांचे बीड-लातूर-उस्मानाबाद या परिसरात मोठे प्रस्थ असून एमआयटीचे सर्वेसर्वा विश्वनाथ कराड यांचे ते पुतणे आहेत.रमेश कराड यांचे मन वळण्यासाठी पंकजा मुंडे यांनी विश्वनाथ कराड यांना मध्यस्थी करण्याची विनंती केली होती. गोपीनाथ मुंडे यांच्याशी असलेले संबंध लक्षात घेता विश्वनाथ कराड यांनी या प्रकरणी यशस्वी मध्यस्थी करत रमेश कराडांना माघार घेण्यासाठी राजी केल्याचे कळते.

दरम्यान,रमेश कराड यांनी आश्चर्यकारकरित्या विधानपरिषद निवडणुकीतून उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे राजकीय चर्चेला उधान आले आहे. काहीदिवसांपूर्वी रमेश कराड यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर पक्षाने त्यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी देखील दिली होती.

कोण आहेत रमेश कराड?

रमेश कराड यांचे बीड-लातूर-उस्मानाबाद या परिसरात मोठे प्रस्थ असून एमआयटीचे सर्वेसर्वा विश्वनाथ कराड यांचे ते पुतणे आहेत. रमेश कराड हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक होते. पंकजा मुंडे या विधानपरिषदेच्या जागेसाठी रमेश कराड यांना उमेदवारी देण्यासाठी अनुकूल नसल्याचं बोललं जातं. रमेश कराड हे लातूर जिल्हा बँकेची निवडणूक नाणेफेकीत हरले.

लातूर ग्रामीण मतदार संघातून दोन वेळा भाजपकडून निवडणूक लढवली, मात्र पदरी पराभवच पडला. रमेश कराड यांचे पंकजा मुंडेंव्यतिरिक्त भाजपातील इतर कुणाशी असे संबंध नाहीत, जे त्यांच्या मदतीला धावून येतील. याचाच फायदा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. रमेश कराड यांना उमेदवारी देत धनंजय मुंडे यांनी मोठी खेळी खेळली होती.