राज्यसभा निवडणूक: भाजपकडून ४ उमेदवारी अर्ज, निवडणुकीतील चुरस वाढली

मुंबई: भाजपने धक्कातंत्राचा वापर केल्याने राज्यसभा निवडणुकीत रंगत आली आहे. भाजपकडून राज्यसभेसाठी प्रकाश जावडेकर, व्ही मुरलीधरन, नारायण राणे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर अशा चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. भाजपाने आज चौथ्या उमेदवाराचा अर्ज दाखल केल्यामुळं राज्यसभेच्या निवडणुक अटीतटीची होऊ शकते.

राज्यसभेच्या एकूण 58 जागांसाठी देशभरात निवडणूक होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आणि राष्ट्रवादीकडून वंदना देसाई यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच आज सोमवार १२ मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. १३ मार्चला अर्जांची छाननी करण्यात येणार आहे तर १५ मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.

विधानसभेचे संख्याबळ पाहता, तीन जागांवर भाजपाचा विजय निश्चित मानला जातो. पण भाजपाने आज चौथ्या उमेदवाराचा अर्ज दाखल केल्यामुळं राज्यसभेसाठी चुरस निर्माण झाली आहे. सहा पेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने आता भाजपाच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेला भाजपाच्या एका उमेदवाराने माघार घेतल्यास ही निवडणूक बिनविरोध होईल अन्यथा 23 मार्च रोजी मतदान घेण्यात येईल.

कोणत्या पक्षाचे किती खासदार?:भाजप -17, काँग्रेस – 12, समाजवादी पक्ष – 6, जदयू – 3, तृणमूल कॉंग्रेस – 3, तेलुगू देसम पक्ष – 2, राष्ट्रवादी कॉंग्रेस – 2, बीजद – 2, बसप – 1, शिवसेना – 1, माकप – 1, अपक्ष – 1, राष्ट्रपती नियुक्त – 3

You might also like
Comments
Loading...