मी निर्दोषच, निकालापूर्वी सलमानची न्यायाधीशांसमोर विनवणी

सलमान खान

टीम महाराष्ट्र देशा- 1998 च्या काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर कोर्टाने मोठा दणका दिला आहे. कोर्टाने सलमानला दोषी ठरविलं असून सलमानव्यतिरिक्त सोनाली बेंद्रे, नीलम, तब्बू, सैफअली खान यांनी कोर्टाने निर्दोष मुक्त केलं आहे. गुरूवारी (मार्च 5) सकाळी कोर्टात पोहचल्यावर सलमान खानने कोर्टरूममध्ये न्यायाधीशांसमोर उभं राहून निर्दोष असल्याचं म्हटलं. ‘मी पूर्णपणे निर्दोष आहे’, असं सलमान कोर्टारूममध्ये उभं राहून म्हणाला. आरोपींपैकी सर्वात आधी सलमान खान कोर्टात पोहचला होता. सलमान खानशिवाय इतर कलाकारांनीही त्यांच्यावरील आरोप कोर्टात फेटाळल्याचं समजतं आहे. या कलाकारांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, सलमान खानच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्टपणे दिसत होता. कोर्टरुममध्ये त्याच्या खुर्चीजवळ अर्पिता आणि अलविरा या दोन्ही बहिणी उभ्या होत्या. न्यायाधीशांनी शिक्षा सुनावताच सलमान मान खाली घालून खुर्चीवर बसला. तो अतिशय दु:खी दिसत होता.तर निकालानंतर अर्पिता आणि अलविरा यांना रडू कोसळलं.कोर्टरुममध्ये सलमान खानचे वकील हस्तीमल सारस्वत यांनी 15 मिनिट त्याची बाजू मांडली. यानंतर न्यायाधीश देव कुमार खत्री यांनी सलमानला विचारलं, “आरोपांवर तुमचं काय म्हणणं आहे?”यावर सलमान म्हणाला की, “माझ्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांच्याशी मी सहमत नाही.”
सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर जोधपूर कोर्टाने सलमानला पाच वर्षांचा तुरुंगवास आणि १० हजार रुपये दंड ठोठावला असून त्याची रवानगी सेंट्रल जेलमध्ये केली जाणार आहे.दरम्यान, कोर्टाने ज्या अभिनेत्यांना निर्दोष ठरवलं आहे, त्याला विश्नोई समाज वरच्या कोर्टात आव्हान देणार आहे. जोधपूर कोर्टाने सैफ अली,तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे यांना निर्दोष ठरवलं आहे.

काळवीट शिकार प्रकरणात जोधपूरमधील न्यायालयाने गुरुवारी निकाल दिला. न्या. देवकुमार खत्री यांनी या प्रकरणी निकाल दिला. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास न्या. खत्री न्यायालयात पोहोचले. त्यापूर्वी सलमान खान, नीलम, सोनाली बेंद्रे, सैफ अली खान, तब्बू हे सेलिब्रिटीही न्यायालयात पोहोचले होते. निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाबाहेर सलमानच्या चाहत्यांनी गर्दी केली होती.

काय आहे प्रकरण ?

कांकाणी गावात दोन काळवीट शिकार केल्याचं हे प्रकरण आहे. सलमानने 1998 मध्ये एक आणि दोन ऑक्टोबरच्या रात्री विविध ठिकाणी काळवीटाची शिकार केल्याचा आरोप आहे.गोळीचा आवाज ऐकून ग्रामस्थ घटनास्थळी आले. तेव्हा सलमानने इतर कलाकारांसोबत गाडीतून पळ काढला, तर दोन्ही हरणांचे मृतदेह तिथेच पडून होते. याप्रकरणी सलमान दोषी ठरला आहे.दरम्यान, कोर्टानं शिक्षा सुनावण्याआधी जेव्हा सलमान आणि इतर आरोपींना आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली, तेव्हा सर्वांनीच आपल्यावरचे आरोप नाकारले होते.आपण काळविटाची शिकार केली नाही, त्यात आपला कुठलाही हात नाही, असं म्हटलं होतं.मात्र कोर्टानं त्यानंतर सलमान खानला दोषी ठरवत असल्याचं जाहीर केलं. तर इतर आरोपींना केवळ पुराव्याअभावी निर्दोष सोडलं.