वाधवान कुटुंबाला प्रवासाची परवानगी देणारे गृहखात्याचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता सक्तीच्या रजेवर

पुणे : राज्यात संचारबंदी असतानाही डीएचएफएलच्या वाधवा कुटुंबासह २३ जणांना लोणावळा ते महाबळेश्वर प्रवासाची परवानगी देण्यात आली. या प्रकरणामुळे गृहखात्याचे प्रधान सचीव (विशेष) अमिताभ गुप्ता चांगलेच अडचणीत सापडले आहेत. हे प्रकरण उघडकीला आल्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे.

संचारबंदी आणि लॉकडाऊन च्या काळात वाधवान कुटुंबाला लोणावळा ते महाबळेश्वर या प्रवासाची परवानगी गुप्ता यांनी आपल्या अधिकृत लेटरहेडवर दिली. ”वाधवान कुटुंबिय हे माझे परिचित असून ते आमचे कौटुंबिक मित्रही आहेत. त्यांना व त्यांच्याबरोबरील लोकांना ‘कौटुंबिक आणिबाणी’च्या कारणासाठी खंडाळा ते पाचगणी असा प्रवास करु द्यावा,” असे पत्र गुप्ता यांनी दिले होते. त्यात वाधवा यांच्यासह त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांच्या एकूण पाच गाड्यांचे क्रमांक व त्यात असलेले लोक याचाही तपशील देण्यात आला होता. ”

हे प्रकरण उघडकीला आल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याचे ट्वीट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. त्यांच्या विरुद्धची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असल्याचे देशमुख यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले आहे.

राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. जिल्हाबंदीचा आदेश धाब्यावर बसवून संबधित लोकांनी २३ जणांसह खंडाळ्याहून महाबळेश्वर असा प्रवास केला. ५ गाड्यांमधून हे वाधवा ते महाबळेश्वरला गेले. पण स्थानिकांनी विरोध केल्याने त्यांना पाचगणीतच थांबवण्यात आले. काल मध्यरात्री या सर्वांना ताब्यात घेऊन विलिनीकरण कक्षात ठेवण्यात आले. या सर्वांवर कलम १८८ नुसार वाई पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.