राष्ट्रीय महामार्गांसाठी भूसंपादनाच्या अडचणी येणार नाहीत- मुख्यमंत्री

पुणे – राष्ट्रीय महामार्गांची कामे जलदगतीने पूर्ण करण्यासाठी तात्काळ भूसंपादन प्रक्रिया राबवावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या असल्याने या प्रक्रियेला आता अडचणी येणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गांची पुणे विभागातील कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.येथील विधानभवनाच्या सभागृहात आज राष्ट्रीय महामार्गांची पुणे विभागातील विविध कामे आणि पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत सुरु असणाऱ्या कामांचा आढावा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री विजय शिवतारे, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, खासदार संजय काकडे, अमर साबळे, वंदना चव्हाण, शिवाजीराव आढळराव पाटील, अनिल शिरोळे, श्रीरंग बारणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आशिषकुमार सिंह, वन विभागाचे सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, महापालिका आयुक्त सौरव राव, पीएमआरडीएचे आयुक्त किरण गीते आदींसह विधीमंडळ सदस्य, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणामार्फत विविध ठिकाणी महामार्गांचे काम गतीने सुरु आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही भूसंपादनाच्या अडचणीमुळे ही प्रक्रिया संथ झाली आहे. त्यामुळे विविध यंत्रणांनी यासंदर्भात एकत्रितपणे काम करावे आणि भूसंपादनाच्या प्रक्रियेला वेग द्यावा. त्या अनुषंगाने आवश्यक ते निर्देश राज्य शासनाने यापूर्वीच जारी केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

You might also like
Comments
Loading...