‘सृजन’ स्वयंसेवी संस्था घोटाळ्यामध्ये भाजप नेत्यांचा समावेश – लालूप्रसाद यादव

Lalu-Prasad-Yadav

पाटणा : बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात स्वयंसेवी संस्थेमध्ये झालेल्या ५०२ कोटी रुपयाच्या घोटाळ्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा समावेश आहे, असा आरोप राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांना केला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाने करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री शहर विकास आराखड्याअंतर्गत जमीन संपादनासाठी सरकारी बॅंकांमध्ये जमा करण्यात येणारे पैसे ‘सृजन’ महिला विकास सहकार्य समिती या स्वयंसेवी संस्थेच्या खात्यात जमा झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. लालू प्रसाद यादव यांनी भाजपचे नेते शाहनवाज हुसैन आणि गिरीराज सिंह हे ‘सृजन’ या स्वयंसेवा संस्थेच्या संस्थापिका मनोरमा देवी यांच्या संपर्कात होते. मनोरमा देवी यांच्यासह शाहनवाज आणि गिरीराज यांचे छायाचित्र समोर आल्याचा दावा लालू प्रसाद यादव यांनी केला आहे. मात्र लालू यांनी केवळ दावा केला असून याविषयी सबळ पुरावे सादर केलेले नाहीत. मनोरमा देवी यांचे यावर्षी एप्रिलमध्ये निधन झाले. दरम्यान, मनोरमा देवी यांना केवळ ओळखत असून झालेल्या घोटाळ्याप्रकरणी कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्टीकरण शाहनवाज हुसैन यांनी केले आहे