fbpx

लालूप्रसाद यादव यांना १४ वर्षांची शिक्षा तर ६० लाखाचा दंड

lalu prasad yadav

नवी दिल्ली: बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना चारा घोटळ्यातील चौथ्या प्रकरणात न्यायालयाने १४ वर्षांची शिक्षा आणि ६० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांना ७-७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर त्यांना ६० लाख रूपयांचा दंड ही ठोठावण्यात आला आहे.

चारा घोटाळ्यात एकूण सहा प्रकरणे आहेत, यातील चौथ्या प्रकरणावर सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सोमवारी लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरविले होते. चारा घोटाळ्यातील तीन प्रकरणांमध्ये लालूंना याआधीच दोषी ठरविण्यात आले आहे.

लालूप्रसाद यादव यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेबाबत अजून संभ्रम आहे. कारण ही शिक्षा एकाचवेळी भोगायची की वेगवेगळी हे अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही. निकालाची प्रत मिळाल्यानंतर सर्व काही स्पष्ट होईल, असे वकिलांनी म्हटले आहे.

दमुका कोषागारमधून ३.१३ कोटी रूपये अवैधरित्या काढल्याप्रकरणी लालूंना विशेष न्यायालयाने सोमवारी दोषी ठरवले होते. सध्या लालूंवर रिम्स रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याच खटल्यात बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांना निर्दोष ठरवण्यात आले होते.