नीटच्या परीक्षेसाठी विदर्भात धावणार लालपरी, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी निर्णय

lalpari

चंद्रपूर : कोरोनामुळे यावर्षी पहिल्यांदाच सर्वच विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. दरम्यान, वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेली प्रवेशपूर्व नीट परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे नागपूरला जायचे कसे, असा प्रश्न सध्या विद्यार्थ्यांना सतावत असतानाच एसटी महामंडळ पुन्हा धावून आले आहे. नागपूरला जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केल्यास त्यांच्या सोयीसाठी बस सोडण्यात येणार आहे.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोरोनामुळे मार्च महिन्यात लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले. दरम्यान दहावी, बारावीचा निकाल लागून आता एक ते दीड महिन्यांचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रवेश घेण्यासाठी बरीच स्पर्धा निर्माण झाली. दरम्यान, वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेली पूर्वपरीक्षा नीट देणे गरजेचे आहे. यासाठी विद्यार्थी एकरावीपासूनच अभ्यास करायला लागतात.

यावर्षी मात्र बारावीचा निकाल लागला तरीही परीक्षा झाली नाही. दरम्यान, परीक्षा मंडळाने आता १३ सप्टेंबर ही तारीख निश्‍चित केली आहे. मात्र परीक्षा केंद्र नागपूर येथे असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बोटावर मोजण्याइतक्याच विद्यार्थ्यांचे पालक आपल्या वाहनांद्वारे विद्यार्थ्यांना नागपूर येथे पोहचवतील. मात्र अन्य विद्यार्थ्यांना नागपूरला जाणे कठीण होणार आहे.

विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सध्या नागपूर गाठणे म्हणजे, दीवास्वप्नच आहे. या विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेता एसटी महामंडळाने उपक्रम सुरु केला असून विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या एक दिवसापूर्वी संबंधित आगार प्रमुखांकडे नाव नोंदवावे, नाव नोंदणीनुसार आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या वेळापत्रकानुसार एसटी महामंडळ त्या त्या आगारातून नागपूरसाठी बस उपलब्ध करून देणार आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांना नागपूर येथे जाऊन परीक्षा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विद्यार्थ्यांना नागपूरला परीक्षा देण्यासाठी जायचे असल्यास त्यांनी संबंधित आगारामध्ये आपले नाव नोंदवावे. यामुळे नागपूर येथे एसटी सोडताना नियोजन करणे सोयीचे होईल. बसमध्ये पुरेशे विद्यार्थी झाल्यास त्या-त्या आगारातून अतिरिक्त बस सोडण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या:-

मराठा आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा आदेशाबाबत राज्य सरकार योग्य ती पुढील कार्यवाही करणार आहे – अशोक चव्हाण

अमृता फडणवीसांनी व्यवहार केला, तर तो काय देवेंद्र फडणवीस यांनी केलेला पदाचा गैरवापर होतो का ?

एकनाथ शिंदेंच्या प्रयत्नांनी वाढणार का गडचिरोलीची सिंचन क्षमता ?