मंत्रिमंडळ विस्तार : लक्ष्मण जगताप यांना मंत्रिमंडळात संधी की होणार पुण्याचे पालकमंत्री ?

टीम महाराष्ट्र देशा : जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र हे फेरबदल २३ मे ला जाहीर होणाऱ्या लोकसभेच्या निकालांवर अवलंबून असणार आहे. अशातच जर गिरीश बापट हे पुण्यातून विजयी झाले तर बापटांच्या जागी लक्ष्मण जगताप यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे, किंवा त्यांना पुण्याचे पालकमंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे.

लक्ष्मण जगताप हे पिंपरी-चिंचवड चे आमदार आहेत. मागील दोन मंत्रिमंडळाच्या विस्तारात लक्ष्मण जगताप यांना मंत्रिमंडळ मिळण्याची शक्यता होती परंतु दोनही वेळेस त्यांना डावलण्यात आले होते, तसेच महेश लांडगे यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. परंतु हे सर्व लोकसभेच्या निकालांवर अवलंबून आहे.

लक्ष्मण जगताप आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यात लोकसभा निवडणुकीपूर्वी मतभेद होते परंतु निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्यात एकमत झाले आणि जगताप यांनी बारणे यांना सहकार्य केले आहे. मंत्रिमंडळ विस्तारत जर जगताप यांनी मंत्रिपद मिळाले नाही तर त्यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिले जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे लक्ष्मण जगताप यांनी नेमकं मंत्रीपद मिळणार की पालकमंत्री बनवले जाणार हाच प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे .