fbpx

तीळाचे लाडू, वड्या आणि विविधरंगी तीळगुळाची दत्तमंदिराला सजावट

पुणे : विविधरंगी हलव्याचे प्रकार, गुळाच्या ढेपा, तीळाचे लाडू, वडी, गुळपोळी यांची आरास दगडूशेठ दत्तमंदिराला करण्यात आली आहे. तीळगुळाचा तन्मणी, लफ्फा, कंबरपट्टा, मुकुट असे विविध दागिने घातलेल्या दत्तमहाराजांची विलोभनीय मूर्ती पाहण्यासाठी भक्तांनी गर्दी केली. मकरसंक्रांतीनिमित्त कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे दत्तमहाराजांना १२५ किलो गूळ, ५१ किलो तीळगूळ आणि हलव्याच्या दागिन्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला.

यावेळी मुस्लीम राष्ट्रीय मंचचे राष्ट्रीय मार्गदर्शक इंद्रेश कुमार यांनी दत्तमहाराजांची आरती केली. तसेच त्यांनी दत्तमंदिरातील इतर उपक्रम व अनसूया कक्षाविषयी माहिती घेतली. मुस्लीम राष्ट्रीय मंचचे संयोजक विराग पाचपोर, लतीफ मकदूम, इरफान पीरजादे, मुस्लीम राष्ट्रीय मंचचे पुणे शहर प्रमुख अली दारुवाला, ट्रस्टचे अध्यक्ष शिरीष मोहिते, कार्यकारी विश्वस्त बी.एम. गायकवाड, खजिनदार अॅॅड.शिवराज कदम जहागिरदार, विश्वस्त युवराज गाडवे यांसह विश्वस्त पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मकरसंक्रातीनिमित्त १२५ किलो गूळ, ५१ किलो तीळगूळ असा नैवेद्य दाखविण्यात आला. मकरसंक्रांतीनिमित्त दाखविलेला तिळगूळ भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात येणार आहे. गुरुवार, दि. १७ जानेवारी रात्रीपर्यंत ही आरास भाविकांना पाहण्याकरीता खुली राहणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

इंद्रेश कुमार म्हणाले, दत्तमहाराज हे सृष्टीचे निर्माणकर्ता आहे. देवाच्या कल्याणकारी रुपांपैकी त्यांचे एक रुप आहे. मकरसंस्क्रांतीनिमित्त दत्तमहाराजांचे दर्शन घेऊन मनाला खूप आनंद झाला. दत्तमंदिरातील प्रसन्नता, स्वच्छता आणि भक्तांमध्ये असलेली आस्था बघून मनाला शांती मिळते. भेदभाव विसरून सर्वांनी एकत्र येत सण साजरे करावे.