‘सत्ता गेल्याने सुधीर मुनगंटीवार वैफल्यग्रस्त झाले आहेत’

blank

टीम महाराष्ट्र देशा – सत्ता गेल्याने भाजपचे नेते वैफल्यग्रस्त झाले आहेत. सरकारचे कामकाज राज्यघटनेनुसार चालते. केंद्रात सत्तेत असल्याने कोणी संविधान पेक्षा मोठे होत नाही. कोणी तशी समजूत करून घेऊ नये. कोणी म्हटलं म्हणून सरकार बरखास्त होत नाही. अशा शब्दात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सुधीर मुनगंटीवार यांना टोला लगावला.

कोरेगाव भीमा आणि एल्गार परिषदेचा तपास केंद्र सरकारकडून स्वताहून  एन.आय.ए.कडे देण्यात आला आहे.  राज्य सरकारने याबाबतीत केंद्र सरकारशी सहकार्य न केल्यास राज्य सरकार वर कारवाई करण्याची घटनेत तरतूद आहे असे सूचक वक्तव्य केलं होत.

दरम्यान, एन.आय.ए.चा अशा पद्धतीने महाराष्ट्रात हस्तक्षेप व्हावा, हे योग्य नाही. भीमा-कोरेगाव संदर्भात फेरआढावा घेण्याची आवश्यकता असल्याचे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले होते. पण त्यानंतर लगेच दोन दिवसात केंद्र सरकार या प्रकरणचा तपास एन.आय.ए.कडे देते, हे योग्य नाही. त्यासाठी महाराष्ट्राची सहमती घ्यायला हवी होती.

किमान चर्चा तरी करायला हवी होती. केंद्र आणि राज्यामध्ये समन्वय राहिला नाही तर राज्यांना काम करणे कठीण होईल. अशा शब्दांत कॉंग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास एन.आय.ए कडे देण्याच्या केंद्राच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या राष्ट्रपती राजवटीच्या वक्तव्याचा समाचार घेतानाच अशोक चव्हाण म्हणाले, ‘मुनगंटीवार यांना काय वाटते, हा त्यांचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात हे सरकारच कायम राहू नये, असेही त्यांना वाटत असेल. पण त्यांचे हे स्वप्न मुंगेरीलाल के हसीन सपनेसारखे आहे.’

शरद पवार यांनी कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी एस.आय.टी. मार्फत करावी अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले होते. पण केंद्र सरकारने एल्गार परिषदेचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एन.आय.ए. कडे देऊन एक प्रकारे राज्य सरकारवर कुरघोडी केली होती.

याच प्रकरणात पुढील चौकशीसाठी एन. आय. ए. ची टीम काल दिवसभर पुण्यात कमिशनर ऑफिस येथे येऊन थांबली होती.पण पोलीस महासंचालक यांच्याकडून कुठलेही आदेश न आल्यामुळे कागदपत्र आणि तपासासंबंधी कुठल्याही बाबी हस्तांतरित करता येणार नाही असा खुलासा करत पुणे पोलिसांनी कागद्पत्र एन.आय.ए. कडे हस्तांतरित करायला नकार दिला आहे.

एन.आय.ए.ने सकाळीच पोलीस महासंचालकांशी पत्रव्यवहार केला होता.पण त्यावर पुढे काहीच कार्यवाही न झाल्याचे सांगण्यात आले आहे.याप्रकरणात पुढे काय होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.