fbpx

कर्नाटकात कमळ फुलणार ? : कुमारस्वामींच्या राजीनाम्याची भाजपने केली थेट मागणी

टीम महाराष्ट्र देशा : कर्नाटकातले जेडीएस–कॉंग्रेसचे सरकार धोक्यात आले असून कुमारस्वामी सरकार अल्पमतात गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आधी १३ आमदारांनी, नंतर सरकारमधील एका अपक्ष मंत्र्याने राजीनामा दिल्यानंतर आता कुमारस्वामी सरकारमधील सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे कुमारस्वामी सरकार संकटात सापडले आहे.

दरम्यान,आमदार राजीनामा मागे घेण्यास तयार नाहीत त्यामुळे कर्नाटक सरकार अडचणीत आलं आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्या शोभा करंदलाजे यांनी माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते बी. एस. येडियुरप्पा यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी कुमारस्वामींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. कुमारस्वामी यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे असं त्या म्हटल्या आहेत. दरम्यान, आम्ही एकही बंडखोर आमदाराच्या संपर्कात नाही असेही भाजपाने म्हटले आहे.

दरम्यान,या १४ आमदारांचे राजीनामे मंजूर झाल्यास २२४ सदस्य संख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेची संख्या २१० होईल. त्यामुळे बहुमतासाठी ११३ ऐवजी १०६ सदस्य संख्या लागेल. १४ आमदारांचा राजीनामा मंजूर झाल्यावर कुमारस्वामी सरकारच्या आमदारांची संख्या केवळ १०४ होईल. त्यामुळे कुमारस्वामी सरकारला बहुमतासाठी दोन जागांची अवश्यकता निर्माण होईल, असं सूत्रांनी सांगितलं.