कुमारस्वामी बुधवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ 

नवी दिल्ली :  सरकार बनवण्यासाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने बीएस येडियुरप्पा यांनी बहुमत चाचणीआधीच काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. बहुमत सिद्ध करण्यासाठी १११ आमदारांचा पाठिंबा आवश्यक होता. पण भाजपाकडे १०४ आमदार होते. बहुमतासाठी बरेच प्रयत्न करुनही सात आमदारांचा पाठिंबा जमवणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर येडियुरप्पांनी बहुमत चाचणीलासामोरे जाण्याआधी राजीनामा दिला.

बीएस येडियुरप्पा  यांनी राजीनामा दिल्यानंतर आता कॉंग्रेसने पाठींबा दिलेले कुमारस्वामी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. कर्नाटकात येत्या सोमवारी नवीन सरकार अस्तित्वात येणार होते. पण आता शपथविधीचा दिवस बदलण्यात आला आहे. कुमारस्वामी आता सोमवार ऐवजी बुधवारी २३ मे रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. जनता दल सेक्युलरचे राष्ट्रीय सचिव दानिश अली यांनी ही माहिती दिली.  राज्यपाल वजुभाई वाला यांनी जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण  दिल्याचेही त्यांनी सांगितले.