कुलभूषण जाधव यांची लवकरच पाकिस्तानकडून सुटका होणार : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर 

टीम महाराष्ट्र देशा : आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताच्या कुटनित्तीचा विजय झाला आहे. भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानने सुनावलेली फाशीची शिक्षेला स्थगित केली आहे. त्यामुळे लवकरच जाधव यांची पाकिस्तानकडून सुटका होईल, असा विश्वास भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत बोलताना व्यक्त केला आहे.

यावेळी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले की, कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी भारताने कायदेशीर लढाई लढली आहे. यामध्ये भारताला यश आले आहे. पाकिस्तानने जाधव यांच्या संदर्भात कोणत्याही प्रकियेचे पालन केलेले नाही. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने १५-१ अशा बहुमताने भारताच्या बाजूने निकाल देताना पाकिस्तानने अनेक ठिकाणी कायद्याचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट केले आहे. या कठीण परिस्थितीतही कुलभूषण यांच्या परिवाराने साहस दाखवले. सरकार कुलभूषण यांच्या सुरक्षेची हमी देते. लवकरच कुलभूषण यांची भारतात वापसी होईल, असे ते म्हणाले.

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना ‘हेरगिरी आणि दहशतवादा’च्या आरोपाखाली पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने एप्रिल २०१७ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याचे भारतात तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर भारताने या निर्णयाविरोधात ८ मे २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्या. अब्दुलक्वी अहमद युसूफ यांच्या अध्यक्षतेखालील १६ सदस्यीय पीठाने या प्रकरणात भारत आणि पाकिस्तान यांची बाजू ऐकून घेऊन २१ फेब्रुवारी २०१९ रोजी निर्णय राखून ठेवला होता. अखेर दोन वर्षे आणि दोन महिने चाललेल्या या खटल्यात न्यायालयाने बुधवारी भारताच्या बाजूने महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्याशी संपर्क ठेवण्याचा, त्यांच्या कायदेशीर लढय़ाची व्यवस्था करण्यास भारताला मज्जाव केला होता. जाधव यांच्या अटकेनंतर त्यांच्याशी राजनैतिक संपर्क ठेवण्याच्या भारताच्या अधिकाराचे पाकिस्तानने उल्लंघन केले,असा ठपका न्यायालयाने आपल्या ४२ पानी निकालपत्रात ठेवला.

दरम्यान कुलभूषण जाधव यांना ३ मार्च २०१६ रोजी बलुचिस्तानमधून अटक करण्यात आली, असा पाकिस्तानचा दावा आहे. मात्र नौदलातून निवृत्तीनंतर जाधव हे व्यापारानिमित्त इराणमध्ये असताना त्यांचे अपहरण करण्यात आले, अशी भारताची भूमिका आहे.