Loksabha- सरकारनं पाकिस्तान विरोधी कडक भुमिका घ्यावी- मल्लिाकार्जुन खरगे

लोकसभेत आज कामकाजाला सुरुवात होताच सदस्यांनी माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना, पाकिस्तानातल्या रावळपिंडी लष्करी न्यायालयानं हेरगिरीच्या आरोपावरून, दिलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेचा मुद्दा उपस्थित केला. सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षांनीही या घटनेचा निषेध केला. याप्रकरणी सरकारनं निवेदन देण्याची मागणी करत काँग्रेस खासदारांनी सभागृहात गदारोळ केला.
सरकारनं पाकिस्तान विरोधी कडक भुमिका घेऊन, कारवाई करण्याची मागणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिाकार्जुन खरगे यांनी केली. सरकारनं इतक्या दिवसात या प्रकरणाचा पाठपुरावा का केला नाही, असा सवाल करत त्यांनी पंतप्रधानांवर टीका केली.
एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी, सरकारनं आपल्या सामर्थ्याचा वापर करुन पाकिस्तानविरोधात कारवाईची मागणी केली. राष्ट्रीय जनता दलाचे जयप्रकाश नारायण यादव, तृणमुल काँग्रेसचे सौगत रॉय, काँग्रेसचे शशी थरुर यांच्यासह अन्य सदस्यांनी कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणण्याची मागणी केली.
याप्रकरणी निवेदन देताना गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी, पाकिस्ताननं जाधव यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. जाधव यांना न्याय देण्यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं.
परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी यासंदर्भात लोकसभा आणि राज्यसभेत निवेदन देताना, जाधव यांना भारतात परत आणण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करणार असून, सरकार त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं. विरोधी पक्षानं या प्रकरणाचं राजकारण करु नये, असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं.