fbpx

क्षीरसागर भाजपच्या गोटात तर मेटेंचे मत बजरंग बप्पांच्या पारड्यात , बीडचे राजकारण रंगले

Vinayak Mete

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सेना-भाजप युतीसोबत राहू, असे मत शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी मांडले होते. मात्र, बीडमध्ये भाजपविरोधी उघड भूमिका घेतल्यानंतर आता पाठिंबा कुणाला द्यायचा हे गुरुवारी शिवसंग्रामतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी विनायक मेटे यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावून राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना पाठिंबा दिला आहे.

विनायक मेटे आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यातील संघर्ष सर्वपरिचित आहे. त्यामुळे मेटे यांनी लोकसभेचा बिगुल वाजताच पंकजा मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडत आपण राज्यात भाजपसोबत राहू मात्र बीडमध्ये नाही, हे जाहीर केले होते. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी औरंगाबाद येथे मेंटेना सूचक इशारा दिला होता. त्यामुळे मेटे काहीसे शांत झाले होते.

दरम्यान, बीड लोकसभेची या वेळेसची निवडणूक अत्यंत रंगतदार होत आहे. मागील आठवड्यात क्षीरसागर बंधूंनी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपच्या प्रीतम मुंडे यांना विजयी करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले. क्षीरसागर बंधू नंतर जिल्ह्यात असंतुष्ट असलेले शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष होते.

पालकमंत्र्यांकडून जिल्ह्यात होत असलेल्या कोंडीमुळे मेटे यांनी समर्थकांच्या बैठकीत भाजपचा जिल्ह्यात प्रचार करणार नाही, परंतु राज्यात मात्र युतीचा घटक म्हणून भाजपसोबत असेल, असे जाहीर केले होते. त्यांची ही दुहेरी भूमिका भाजप श्रेष्ठींनाही आवडली नाही. कोणताही एकच निर्णय घ्या. राज्यात सोबत असाल तर बीड जिल्ह्यातही भाजपसोबत काम करावे लागेल, असे प्रदेशाध्यक्षांनी सांगितले होते.