प्रशासनाच्या आदेशानंतर क्षीरसागर काका-पुतणे होम क्वारंटाइनमध्ये

बीड : राज्यात लॉकडाउन आणि संचारबंदी असतानाही नियमांचा भंग करुन शिवसेनेचे नेते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर दोन दिवसांपूर्वी मुंबईहून बीड शहरात परतले होते. मुंबईहून आल्यामुळे त्यांना होम क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र, याचा फटका त्यांचे पुतणे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनाही बसला आहे. त्यांनाही होम क्वारंटाइन राहण्याचे प्रशासनाने बजावले आहे. विशेष म्हणजे क्षीरसागर काका-पुतणे कुटुंबासह एकाच बंगल्यात राहतात.

दरम्यान, बीड जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांसह ३३ जणांचे कोरोना चाचणी अहवाल सोमवारी सायंकाळी निगेटिव्ह आले, मरकज प्रकरणातील आठ लोकांना बीड जिल्ह्याच्या सीमेवर अटकाव करताना या सर्व पोलिस कर्मचारी तसंच होमगार्ड यांचा संपर्क आला होता. या वरून या सर्वांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.

देशभरात कोरोना बाधितांची संख्या ४ हजार ४२१ वर पोचली असून कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ११४ झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं आज ही माहिती दिली. उपचारानंतर ३२५ रुग्ण यातून बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडलं आहे.

राज्यात, आणखी २३ कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून आता राज्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या ८९२ झाली आहे. नवीन २३ रूग्णांमध्ये १० रूग्ण मुंबईत आढळले असून पुणे शहरात ४, अहमदनर -३, बुलडाणा आणि नागपूर इथं प्रत्येकी २, तर सांगली आणि ठाण्यात प्रत्येकी एक रूग्ण आढळला आहे. राज्यात आतापर्यंत ५२ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यृ झाला आहे.