आणखी 102 गावांना मिळणार ‘कृषी संजीवनी’

टीम महाराष्ट्र देशा : यंदापासून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये जिल्ह्यात 102 गावांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. यापुढे जिल्ह्यातील एकूण 287 गावांचा या योजनेत समावेश असणार आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यात आली आहे. नवीन निकषांनुसार पाच हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार असल्याने जिल्ह्यात या योजनेच्या लाभार्थींची व्याप्ती वाढत आहे. या प्रकल्पांतर्गत वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी पाच हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करता येतो. यामध्ये शेततळे, पाईप, मोटार, ठिंबक-तुषार सिंचन, फळबाग लागवड, बीजोत्पादन, नवीन विहीर, विहीर फेरभरण, पॉलिहाऊस, शेडनेट, रेशीम उद्योग, मधुमक्षिका पालन, मत्स्यपालन; तसेच भूमिहीन, अनुसूचित जाती, जमाती अनुसूचित जमाती महिला शेतकरी, विधवा व परित्यक्त्या महिलांना बंदिस्त शेळीपालन व कुक्कुटपालन या घटकांचा समावेश आहे.

सर्व घटकांना 75 ते 100 टक्के अनुदान दिले जाते. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होत असल्याने तत्काळ अनुदान डी.बी.टी. पद्धतीने खात्यावर जमा होत आहेत. आतापर्यंत एक हजार 435 लाभार्थ्यांना तीन कोटी 60 लाख रुपये अनुदान खात्यावर जमा करण्यात आले आहे. गावे दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीने मृद व जलसंधारणाची कामे राबविण्यात येणार आहेत.

पहिल्या टप्प्यात 48 गावांची निवड करण्यात आली होती. त्यांचे गावस्तरीय सूक्ष्म नियोजन पूर्ण होऊन सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे. गावामध्ये शेतीसाठी पाण्याची गरज ओळखून पाण्याचा ताळेबंद तयार केला. पहिल्या वर्षात एक हजार 200 हेक्टर क्षेत्रावर बांधबंदिस्तीची व नाला खोलीकरणांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. शेतकरी उत्पादक कंपनी व गटांना शेती व शेतीपूरक व्यवसाय व प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी 60 टक्के अनुदान दिले जाते. यात गोदाम, शीतगृह, शेतमाल ग्रेडिंग युनिट तसेच विविध प्रक्रिया उद्योग आदी घटकांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

Loading...