क्रांतीविरांगणा हौसाबाई पाटील यांचे कराडमध्ये निधन

housabai patil

कराड : क्रांतिसिंह नाना पाटील यांची कन्या आणि भाई भगवानराव पाटील मोरे यांच्या पत्नी हौसाक्का पाटील यांचे आज निधन झाले. त्या ९६ वर्षांच्या होत्या. हौसाबाई पाटील यांच्यावर कराड येथील कृष्णा चॅरिटेबल रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. त्यांनी आपले संपूर्ण जीवन स्वातंत्रलढा तसेच स्वातंत्र प्राप्तीनंतर सामाजिक चळवळ आणि विकासासाठी अर्पण केले.

पत्नीच्या मृत्यू नंतर क्रांतीसिह नाना पाटील यांना हौसाक्कांकडे फारसे लक्ष देता आले नाही मात्र वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन त्या देखील भारताच्या स्वातंत्र लढ्यात उतरल्या होत्या. हौसाक्कानी ब्रिटिशांविरुद्ध लढा उभारला होता त्यांनी वांगी या ठिकाणचा ब्रिटिशांचा शस्त्रसाठा लुटण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला होता. भवानीनगर रेल्वे स्थानकावरती इंग्रजांचा शस्त्रसाठा लुटण्यासाठी वेषांतर करून त्यांनी योजना आखली आणि ती योजना त्यांनी यशस्वी करून दाखविली होती.

गोवा स्वतंत्र व्हावा यासाठी त्या मांडवी नदी पार करून पणजी या ठिकाणी पोहोचल्या. त्यांना स्वातंत्र्यापूर्वी तसेच स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आंदोलनामध्ये अनेक वेळा तुरुंवास सहन करावा लागला होता. त्यांचे व्यक्तिमत्व निर्भीड स्वाभिमानी तसेच प्रामाणिक होते. त्यांनी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये जाहीर सभेत पुरंदरेच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला विरोध केला होता.

सांगली येथील एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला झाला होता त्यावेळीही हौसाक्का हातात काठी घेऊन आव्हाडांच्या समर्थनार्थ उभ्या राहिल्या होत्या. शेतकरी तसेच कष्टकरी वर्गाला न्याय मिळाला पाहिजे याकरता त्या सतत शासना विरुद्ध लढा देत होत्या. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. क्रांतीविरांगणा हौसाबाई पाटील यांच्यावर हणमंतवडिये या गावात शासकीय इतमामात पार्थिवावर अंत्यविधी होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या