बीड येथे २०० बेड असलेले कोविड सेंटर होणार सुरु; देवेंद्र फडणवीस करणार उद्घाटन

बीड: जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्याची परिस्थिती चिंताजनक झाली असून जिल्हा कोरोनाच्या विळख्यात असल्याचे चित्र येथे बघायला मिळत आहे. शहरभरात फक्त रुग्णवाहिकांचे आवाज, अशा चिंताजनक परिस्थितीत एकीकडे रुग्णांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे रुग्णालयांमध्ये उपचारासाठी रुग्णांना जागा मिळत नाहीये, अशी केविलवाणी परिस्थिती निर्माण झाली आहे. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नवीन कोविड केअर सेंटर सुरु होत आहेत.

कोरोना काळात जनतेला आधार देण्यासाठी शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांच्या मार्गदर्शनात जिजाऊ कोविड सेंटर बुधवारपासून (ता.५ मे) कार्यान्वित होत आहे. २०० बेडच्या या सेंटरचे उद‌्घाटन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते होत आहे. अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून संस्था चालक बबन शिंदे यांनी शाळेची इमारत रुग्णांसाठी उपलब्ध करून दिली.

गरज वाटल्यास व शासनाने परवानगी दिल्यास याठिकाणी ५०० बेडही सुरू करण्याची तयारी केली आहे. याचा पूर्ण खर्च संस्थेमार्फत केला जाणार आहे. रुग्णांना सर्व सोयी मोफत दिल्या जाणार आहेत. या कोविड सेंटरवर एमबीबीएससह इतर डॉक्टर्स, वॉर्ड बॉय, नर्स असा अनुभवी स्टाफ असणार आहे. शिवाय शासकीय निकषांप्रमाणे दर्जेदार व संपूर्ण प्रथिनयुक्त शाकाहारी जेवण दिले जाणार आहे. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी बाहेरील जेवणास येथे बंदी असणार आहे. रुग्णांसाठी आरोग्यासह योगाभ्यास व इतर मनोरंजनात्मक उपक्रमही याठिकाणी राबवण्यात येणार आहेत. बुधवारी या कोविड सेंटरचे उद‌्घाटन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, शिवाजी महाराज नारायणगडकर, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, एसपी, आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक उपस्थित असणार आहेत. फुल ना फुलाची पाकळी या नात्याने हा सेवा यज्ञ असल्याचे मेटे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या