आपला पक्ष सांगण्यास कोतकर यांची टाळाटाळ; पदभार घेताना भाजप, शिवसेनेची अनुपस्थिती!

bjp/sivsena/ratravadi

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- स्थायी समितीच्या सभापती पदासाठी मनोज कोतकर यांचे नाव भाजपकडून अंतिम असल्याचे सांगण्यात येत असतानाच मनोज कोतकर यांनीच राष्ट्रवादीत काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. नंतर त्यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड देखील झाली. काल कोतकर सभापतीपदाचा कार्यभार घेण्यासाठी महापालिकेत आले असता, त्यांनी फक्त शहराच्या विकासावर भाष्य केले.

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या उपस्थितीत त्यांनी पदभार स्वीकारला असला, तरी महाविकास आघाडीचा धर्म पाळला असे दोन दिवसांपूर्वी सांगणार्‍या शिवसेनेचा एकही नगरसेवक यावेळी उपस्थित नव्हता. आपण कोणत्या पक्षात आहात असे विचारल्यावर, या प्रश्नाला त्यांनी जाणीवपूर्वक उत्तर देण्याचे टाळले. आपण शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून नागरिकांसाठी कामे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भाजपचे नगरसेवक असलेले कोतकर स्थायी समितीच्या सभापती पदासाठी राष्ट्रवादीत गेले. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून भाजपबाबत नकारात्मक चर्चा शहरात होत आहे. कोतकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महापौर बाबासाहेब वाकळे यांनीही त्यांचा सत्कार केला. भाजपच्या प्रतिमेला धक्का बसू लागल्यानंतर भाजपने काल घाईघाईत कोतकर यांना नोटीस बजावली आहे. त्यात राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा पक्षविरोधी कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

राष्ट्रवादी काॅंग्रेसनेही कोतकर हे आपल्याच पक्षाचे असल्याचे म्हटले आहे. याच कारणाने शिवसेनेने त्यांच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेतला. शिवाय आज पदभार स्विकारताना कोतकर यांच्यासोबत केवळ राष्ट्रवादी काॅंग्रेसचेच नगरसेवक उपस्थित होते. भाजपचे नगरसेवक तेथे फिरकले नाहीत. परंतु असे असले तरी कोतकर यांनी आपण कोणत्या पक्षात आहात, या प्रश्नाला बगल दिली. पक्षाबाबत काहीही बोलण्यास त्यांनी असमर्थता दर्शविली आहे.

कोतकर यांच्या पदभाराच्या कार्यक्रमास महापालिकेतील विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्यासह राष्ट्रवादीचे नगरसेवक कुमार वाकळे, प्रकाश भागानगरे उपस्थित होते. पदभार स्वीकारल्यानंतर महापौर बाबासाहेब वाकळे, राहुल कांबळे, मनोज दुलम, गणेश ननावरे, अजय चितळे यांनी कोतकर यांचा सत्कार केला.

महतवाच्या बातम्या :-