fbpx

तर कोथरूडमधील मेट्रोच काम बंद पाडणार – दीपक मानकर

dipak mankar image

टीम महाराष्ट्र देशा – पुणे: महापौर मुक्ता टिळक यांनी मागील महिन्यात शिवसृष्टीचा प्रश्न मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मार्गी लावणार असल्याचे सांगितले होते. मात्र तेव्हापासून मुख्यमंत्री पाच वेळेस पुणे शहरात आले तरीही कोणताच ठोस निर्णय होताना दिसत नाही त्यामुळे येत्या महिनाभरात जर हा प्रश्न मार्गी लागला नाही तर मेट्रोच काम बंद पाडणार असल्याचा इशारा माजी उपमहापौर तथा राष्ट्रवादी नगरसेवक दीपक मानकर यांनी दिला आहे. दरम्यान मानकर यांनी मुख्यसभेत इशारा देताच शिवसेना मनसे आणि काँग्रेसने आपला पाठींबा दर्शवला आहे.

‘निवडणुकीच्या आधी भाजपने सिंहगडावर शपथ घेतली.मात्र, निवडून आल्यापासून शिवसृष्टी विषयी कोणतीच हालचाल होताना दिसत नाही. त्यामुळे यापूढे थेट रस्त्यावर उतरून संघर्ष’ करण्याचा इशारा काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी दिला आहे

तर ‘आज आमच्यावर टीका करणारेच मागील काळात सत्तेवर होते. त्यावेळी शिवसृष्टीचा विषय का मार्गी लावला गेला नाही. मात्र आम्ही छत्रपतींच्या मार्गाने काम करत असून लवकरच कोथरूडमध्येच हे काम केलं जाणार असल्याच’ स्थायी समिती अध्यक्ष मुरली मोहोळ यांनी यावेळी सांगितलं आहे.

कोथरूड कचरा डेपो प्रकल्पाच्या जागेवर शिवसृष्टी उभारण्याचा प्रस्ताव पुणे महापालिकेकडून मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान त्याच ठिकाणी वनाज ते रामवाडी मेट्रोचा डेपो उभारण्याचे देखील प्रस्तावित करण्यात आले आहे. यामुळे शिवसृष्टी होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.