कोकण किनारपट्टीला ओख्खी वादळाचा तडका

okhhi-cyclone

टीम महाराष्ट्र देशा: केरळ आणि तामिळनाडू राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागाला तडाखा दिल्यानंतर ‘ओख्खी’ चक्रीवादळ पश्चिमेकडे लक्ष्यद्वीप बेट समूहाच्या दिशेने सरकले. मात्र आता या वादळाची तीव्रता आता कमी होत असल्याचे उपग्रहावरून प्राप्त छायाचित्रावरून दिसून येत असून महाराष्ट्र , गोवा, कर्नाटक, गुजरात सह काही राज्यात येत्या काही दिवसांत पावसाची श्यक्यता वर्तविली जात आहे. मात्र या वादळाचे परिणाम शेजारील राज्यांमध्ये जाणवू लागले आहेत. सिंधुदुर्गात शनिवारी सर्वत्र ढगाळ वातावरण राहिल्यानंतर उधाणाची स्थिती नसतानाही भरतीच्या वेळी रात्री किनारपट्टी भागात समुद्राच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली होती. या वेळी किनारपट्टी भागात खळबळ उडाली.

मालवण येथील रापण व्यवसायिकांनी होड्या दोरखंडाच्या साहाय्याने बांधून ठेवल्या. मात्र या पूर्वीच मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांच्या जाळ्यात खरबा बांगडा व काही प्रमाणात तुफानी नावाचा मासा सापडला. हे मासे वादळी हवामानात समुद्र किनाऱ्याच्या दिशेने येतात असे येथील स्थानिक मच्छीमारांचे म्हणणे आहे.

रविवारी सकाळी सुद्धा मालवण येथील किनारपट्टी भागात भरतीच्या वेळी पाण्याच्या पातळीत वाढ झाली. रविवारी सकाळी ढगाळ वातावरण नव्हते मात्र पाण्याच्या प्रवाहाचा जोर कायम राहिला. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी सिंधुदुर्ग किल्ला होडी व्यावसायिकांनी रविवारी सकाळीच होडी सेवा बंद ठेवली. सुट्टीचे दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात किल्ला दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांना बंदर जेटीवरूनच किल्ला दर्शन करावे लागले. मोठ्या मच्छिमार नौका देवगड बंदरात आश्रयासाठी रवाना झाल्या.या प्रकारची परिस्थिती अजून काही दिवस राहण्याची शक्यता असून ६ डिसेंबरपर्यंत हाय-अलर्टच्या सूचना वजा नोटीस मच्छिमार, मच्छिमार संस्थांना देण्यात आल्याचे व जलक्रीडा व्यवसायिकांना परिस्थितीत सुधारणा होईपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्याचेही बंदर विभागाकडून सांगण्यात आले.

Loading...