…तरीही पाच वर्षात सत्ता बदल होणार नाही; हसन मुश्रीफ यांचा भाजपला टोला

कोल्हापूर : उध्दव ठाकरे यांचे सरकार येत्या डिसेंबरमध्ये कोसळणार आहे, असे आरोप भाजपकडून केले जात आहे. याचाच धागा पकडत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपवर शाब्दिक निशाणा साधला आहे. ‘ भाजपने कितीही टोलेबाजी केली तरीही पाच वर्षात सत्ता बदल होणार नाही,’ असा विश्वास देखील व्यक्त केला.

ते कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान बोलत होते. ‘सत्ता गेल्याचे इतके वाईट वाटते, हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील करीत असलेल्या बेताल वक्तव्यांवरुन दिसूत येते. आमच्या पक्षातून आऊट गोईंग झालेले आणि ते पुन्हा भाजपमधून बाहेर पडू नयेत, म्हणून त्यांना अनेक आमिषे दाखविली जात आहेत,’ असा आरोप त्यांनी केला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सत्ता गेल्याचे दु: ख झाले आहे. या वैफल्यातून सरकारवर आरोप केले जात आहेत. त्यांना अधिक जागा मिळवूनही सत्ता स्थापन करता आलेली नाही. त्यांची राजकीय पिछेहाट झाल्याने त्यांचा तोल सुटला आहे,’ अशी घणाघाती टीका त्यांनी भाजपवर गेली.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकारणावर शिवाजी विद्यापीठात पीएचडी करण्याची इच्छा काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी गाइड म्हणून माझी निवड करावी. त्यांना पीएचडीसाठी शुभेच्छा आहेत,’ असे हसन मुश्रीफ म्हणाले.