पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचे शिवधनुष्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पेलतील का ?

हेमंत रणपिसे : यंदा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या भागात अतिवृष्टीने महापूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले. सांगली आणि कोल्हापूरात तर महाजलप्रलय झाला. या महाजलप्रलयाने सांगलीतील ब्रह्मनाळ गावात मृत्यूने थैमान घातले. सांगली कोल्हापूरातील महाजलप्रलयाची विविध वृत्तपत्रात आलेली छायाचित्रे पाहून या जलप्रलयाची प्रचिती येते. गावेच्या गावे महापूरात बुडत असताना प्राणहानी झाली, वित्तहानी झाली. मुक्या जनावरांचे हाल झाले. अनेक जनावरे वाहून गेली. लोकांचे संसार वाहून गेले. शेकडो गावे; हजारो घर संसार वाहून गेलेत.अनेकांचे बळी या महापुराने घेतले. अनेक गावे नव्याने उभारायचे आहेत. हजारो घरे नव्याने बांधायची आहेत. या महापूरात वाहून गेलेले घर संसार पुन्हा उभारण्याचे शिवधनुष्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उचलले आहे.

पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचे मोठे आव्हान राज्य शासनासमोर आहे. पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचे आव्हान पेलण्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे सरसावले आहेत. मराठी माणूस हा भावनिक आहे. त्याच्या मनात मानवतेचा महासागर आहे. मुंबईसह राज्यभरातील सामान्य मराठी माणसांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. अल्पावधीत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लाखो मराठी हात पुढे आले. पूरग्रस्तांकडे जणू मदतीचा महापूर वाहू लागला आहे. शासन प्रशासनाने महापूर ओसरताच पूरग्रस्तांच्या आरोग्यासाठी आणि गावांच्या स्वच्छतेसाठी वेगाने काम सुरु केले. आलेल्या मदतीचे वाटप पूरग्रस्तांना होत आहे. या महाजलप्रलयाने सांगली कोल्हापूराचे झालेले नुकसान भरुन काढणे महाकठीण काम आहे.

Loading...

त्यासाठी देईल तितका निधी कमी पडणार आहे. निधीची आवश्यकता असताना पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सर्व प्रथम धावून आलेला लोकप्रतिनिधी म्हणजे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले हे ठरले आहेत. ना. आठवले यांनी सर्वप्रथम सांगली आणि कोल्हापूरच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपल्या खासदार निधीतून 50 लाखांचा निधी जाहीर केला. सांगली आणि कोल्हापूरच्या दोन्ही जिल्ह्याच्या जिल्हाअधिकार्यांकडे प्रत्येकी 25 लाखाचा खासदार निधी ना. आठवलेंनी पाठविला. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या भेटी घेतल्या. पूरग्रस्त भागाची पाहणी केली. पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी निधीची आवश्यकता लागणार असल्याचे त्यांनी ओळखले आणि सर्व प्रथम पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आपल्या खासदार निधीतील 50 लाख रुपये देऊ केले. त्याच बरोबर रिपब्लिकन पक्षातर्फे 12 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिले.

रामदास आठवले यांनी स्वत: आपला खासदार निधी प्रथम जाहीर करुन नंतर अन्य लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार यांना आपला निधी पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी देण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर राज्यभरातील आठवलेंच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. ना. रामदास आठवलेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यभरातील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना मदत करण्याचा ओघ सुरु केला. मुंबईसह राज्यभरातील शेकडो कार्यकर्त्यांनी अन्नधान्य, कपडे, जीवनपयोगी वस्तूंची मदत पूरग्रस्तांकडे रवाना केली. राज्यभरातील सर्व पक्ष संघटनांच्या, जातीधर्माच्या, भाषेच्या लोकांनी सांगली, सातारा, कोल्हापूरातील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. महापूर ओसरल्यानंतर सांगली कोल्हापूरात मदतीचा महापूर आल्याचे चित्र दिसत आहे. मदतीचा हा महापूर मानवता जागी असल्याचे प्रतिक आहे. केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी पूरग्रस्तांच्या पुनर्वनासाठी खासदार निधी देण्याचा आदर्श निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख मा.खा. प्रकाश आंबेडकर यांनी सांगलीतील ब्रह्मनाळ हे गाव पुनर्वसनासाठी दत्तक घेतले हे जाहीर केले. त्याचबरोबर कोल्हापूरचे खासदार श्रीमंत संभाजी छत्रपती यांनी पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी 5 कोटीचा खासदार निधी जाहीर करुन कमाल केली. त्यांच्या निर्णयाचे ही जनतेतून स्वागत झाले. याप्रमाणे सांगली कोल्हापूरातील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मदत करण्याचे आवाहन होताच रिपाइं चे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे सामाजिक न्याय राज्यमंत्री ना अविनाश महातेकर यांनी आपल्या वेतनाचे 1लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द केला. रिपाइं चे राष्ट्रीय उपाध्यक्ष लखमेंद्र खुराणा यांनी ही 11 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिला. अल्पावधीत अनेकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 20 कोटीहून अधिक भरीव मदत जमा केली. लाखो मदतीचे हात पुढे येत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचे शिवधनुष्य जरुर पेलतील असे आश्वासक चित्र उभे राहिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासु मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रविण सिंह परदेशी यांच्यावर सांगली, कोल्हापुरातील पुरग्रस्तांच्या पुनर्वसनाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी सोपविली आहे. महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील पुरग्रस्तांच्या पुनर्वसनाचे सर्वांना सोबत घेऊन काम करीत आहेत. त्यांच्या या सर्वांच्या साथीने मुख्यमंत्री पुरग्रस्तांच्या पुनर्वसनाचे शिवधनुष्य सहज उचलतील.

पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मदतीचा महापूर सांगली कोल्हापूराकडे वाहत आहे. सातार्यातील पाठण आणि कराड येथील पूरग्रस्तांना ही मदत मिळत आहे मात्र नाशिकमध्ये अतिवृष्टीने जुने वाडे कोसळले, महापूर आला आणि त्यापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीने महापूर आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांना राज्यातून सांगली कोल्हापूरच्या तुलनेत पुरेशी मदत मिळालेली नाही त्या पार्श्वभूमीवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सिंधुदुर्गमधील पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. यातून शिवसेनेतर्फे सिंधुदुर्गातील पूरग्रस्तांना मोठी मदत मिळण्याची आशा आहे. राज्यभरातील अन्य पक्षांनी आणि संघटनांनी सांगली कोल्हापूर प्रमाणे सिंधुदुर्ग, रत्नागिरी या पट्टयातील पूरग्रस्तांना मदत केली पाहिजे.

सांगली कोल्हापूरात मदतीचा महापूर आला आहे. हे मराठी जनांच्या मनातील माणूसकीचे प्रतिक आहे. सातार्यातील पाठण कराडसह सांगली आणि कोल्हापूरातील पूरग्रस्तांना विविध स्तरावर मदत पोहोचली जात आहे. हे चित्र समाधानाचे आणि निकोप समाजस्वास्थाचे प्रतिक आहे. मात्र पूरग्रस्तांना अशी भरीव मदत होत असताना एक-दोन ठिकाणी पूरग्रस्तांना मिळणारी मदत अनुसूचित जाती जमातीच्या पूरग्रस्तांपर्यंत पोहोचू दिली जात नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. मागासवर्गीय पूरग्रस्तांवर अन्याय होत असल्याची माहिती सांगली जिल्ह्यातील पळूस तालुक्यातील भिलवडी या गावातून आणि सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील अंकली या गावातून मिळाली आहे. पूरग्रस्तांना पाठविण्यात येणारी मदत मागासवर्गीय आणि उच्चवर्णिय संवर्ण असा भेदभाव करुन पाठविली जात नाही. मात्र पूरग्रस्तांमधील मागासवर्गीयापर्यंत मदत पोहोचू दिली जात नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी माणुसकीची अनेक आदर्श उदाहरणे घडत असताना अंकली आणि भिलवडी या गावातील मागासवर्गीय पूरग्रस्तांच्या तक्रारींचे उदाहरण दुर्लक्षीण्यासारखे नाही.

पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी माणसुकीची संजीवनी वाढविणे गरजेचे असताना भेदभावाचे विष समाजात कोणी कालवता नये याची काळजी शासनाने घ्यावी. तसेच केवळ दोन गावात मागासवर्गीय पूरग्रस्तांना मदत मिळवू दिली जात नसल्याची कटू तक्रार पुढे आली असली तरीही संपूर्ण पूरग्रस्तांना निष्पक्ष कोणताही भेदभाव न करता समान मदत वाटप केली जात आहे. माणुसकीचे नाते मदत रुपाने जपले जात आहे. पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मदत करताना समतेचे, ममतेचे, मानवतेचे विचार आपल्या मनात वाढत राहू द्या. निसर्गातील सुर्यकिरण कोणताही भेदभाव न करता सर्वांना प्रकाश देतो. नदी कोणताही भेदभाव न करता तहानलेल्याची तहान भागवते आणि वृक्ष कोणताही भेदभाव न करता सावली आणि फळे देतात त्याचप्रमाणे माणसानेही निसर्गावर प्रेम करावे आणि निसर्गाप्रमाणे कोणताही भेदभाव न करता माणुसकीचे नाते जपावे. मानवतेचा, समतेचा, एकतेचा हाच विचार एकमेकांच्या सहाय्याने पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचे धेय्य साध्य करील. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्व महापुरुष आणि संतांच्या विचारानुसार मार्गक्रमणा केल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक आव्हान लिलया पेलतील. आम्हाला विश्वास आहे की सर्वांना सोबत घेवून सांगली कोल्हापूरातील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचे शिवधनुष्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जरुर पेलतील.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
माझ्या भावाची प्रकृती ठणठणीत, काळजी करण्याचे कारण नाही - उदयनराजे भोसले
ही सदिच्छा भेट आहे. बाकी तपशिलात खोल शिरण्याची गरज नाही - खा. संजय राऊत