कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा एकदा पुराचा फटका बसण्याची शक्यता

टीम महाराष्ट्र देशा : कोल्हापूर जिल्ह्यावर पुन्हा एकदा जल आपत्ती येण्याची शक्यता आहे. कारण गेले दोन दिवस होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीने पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडली आहे. तसेच जिल्ह्यातील 55 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. शहरात पावसाची काही प्रमाणात उघडीप असली तरी धरण क्षेत्रात मात्र जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी 33 फुटांवर गेली आहे.

काही दिवसांपूर्वीचं कोल्हापूर सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसला होता.या महापुरामुळे संपूर्ण जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं होतं. घरात पाणी शिरल्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. त्यातून आता कुठे घरं सावरत नाहीत तर पुन्हा एकदा पुराचं सावट कोल्हापूरकरांवर आल आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने राधानगरी धरणाचे 5 स्वयंचलित दरवाजे खुले करण्यात आले आहेत तर कोयना, वारणा धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

दरम्यान काही दिवस उसंत घेतल्यानंतर राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. खासकरून पश्चिम महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. या अतिवृष्टीमुळे मुंबईची पुन्हा एकदा तुंबापुरी झाली होती. तर पुणे, ठाणे, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यातही जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच येत्या २४ तासात पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.