आधी हद्दवाढ, नंतर निवडणूक; कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा मुद्दा पेटणार ?

kolhapur

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकांची चाहूल लागली आहे. कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहाची मुदत नोव्हेंबर महिन्यातच संपली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक लांबणीवर पडल्याने कादंबरी बलकवडे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून डिसेंबर महिन्यात आरक्षण सोडत देखील काढण्यात आली आहे.

यामुळे आता इच्छूकांची शहरातील वरिष्ठ नेत्यांकडे गर्दी वाढली आहे. अशातच गेली अनेक दशके कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. हद्दवाढीचा मुद्दा रखडल्याने महापालिकेला उत्पन्न वाढीस देखील अनेक अडचणी येत असून मूलभूत गरज देखील पूर्ण करण्यासाठी महापालिकेवर आर्थिक बोजा वाढत आहे.

शिवसेना नेते व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सकारात्मकता दर्शविल्यानंतर हद्दवाढ कृती समितीनेही पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यातूनच हद्दवाढीनंतरच महानगरपालिकेची निवडणूक, घ्या असा आक्रमक सूर काल सायंकाळी झालेल्या बैठकीत निघाला आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनच ठराव देखील करण्यात आला.

दरम्यान, जनआंदोलन उभारून रखडलेली हद्दवाढ करण्यासाठी जागृती करण्याचे देखील कृती समितीने ठरवले आहे. ‘आता नाही, तर कधीच नाही’ असं आवाहन करून कृती समितीतर्फे लोकप्रतिनिधींना देखील आग्रह करण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्याची सुरुवात महापालिकेत बैठक घेऊनकेली केली. महापालिकेच्या इतिहासात नगरविकास खात्याचे मंत्री येण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. दरम्यान, शिंदे यांनी शहरातील इतर विकासकामांचा देखील आढावा घेतला आहे.

स्वातंत्र्य काळापासून पुणे शहराची तब्बल १७ वेळा हद्दवाढ झाली आहे. मात्र, कोल्हापूर महापालिकेची एकदा देखील हद्दवाढ होऊ शकलेली नाही. यामुळे शहरात इतर नैसर्गिक सोयी व वातावरण पोषक असून देखील विकासाला योग्य प्रमाणात चालना मिळालेली नाही. शिवसेनेचे माजी आमदार व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शहरातील विकासकामांसह हद्दवाढ देखील करण्यावर चर्चा सुरु असल्याची माहिती ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना दिली आहे.

महत्वाच्या  बातम्या