कोल्हापूरकरांना दिलासा: राधानगरीचे २ स्वयंचलित दरवाजे बंद, तर पंचगंगेची पाणीपातळी झाली इतकी!

Kolhapur flood

कोल्हापूर: कोल्हापूरमध्ये सलग ४ दिवस कोसळणाऱ्या पावसाने पूरजन्य परिस्थती निर्माण झाली होती. यामुळे, गेल्यावर्षी हाहाकार माजवणाऱ्या महापुराची सर्वांनाच आठवण झाली. तर, गेल्या वर्षीचा महापुर, कोरोनाचे संकट आणि आता पुन्हा उभे ठाकलेले हे अस्मानी संकट यामुळे सामान्य नागरिकांना एकानंतर एक अशा सतत येणाऱ्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.

मुसळधार पाऊस, राधानगरी धरणाच्या ३ स्वयंचलित दरवाज्यातून ७ हजार क्युसेक पाण्याचा भोगावती नदीतून होणारा विसर्ग यामुळे काल, पंचगंगा नदीची पाणीपातळी ४४ फूट १० इंचावर गेली होती. यामुळे जिल्ह्यातील अनेक सखल भागात पाणी शिरले होते, तर शहरातील शाहूपुरी भागात देखील या पुराचे पाणी आले होते. सतर्कता म्हणून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या आदेशानुसार ५ हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते. राज्याचे गृहराज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील हे देखील या परिस्थितीवर लक्ष ठेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात होते.

संतापजनक: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला; कर्नाटक सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?

यात, एक दिलासादायक बाब म्हणजे, काल दिवसभरापासू पावसाचा जोर ओसरला असून आज राधानगरी धरणाचे २ स्वयंचलित दरवाजे बंद झाले. एका दरवाजातून अजूनही भोगावती नदीमध्ये विसर्ग चालू आहे. यामुळे, पंचगंगेच्या पाणीपातळी मध्ये ४ इंचाची घट झाली असली, तरी अजूनही नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. दरम्यान, निसर्गाचे चक्र पुन्हा कधीही फिरू शकते त्यामुळे, पुन्हा पावसाने धरल्यास परिस्थिती बिघडू शकते, हे लक्षात घेता नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

मध्यरात्री गावातील वीज पुरवठा बंद करुन बेळगावात शिवरायांचा पुतळा पुतळा हटवला

यावेळीही, अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे, त्यामुळे कोरोनाने बसलेला आर्थिक फटका, त्यात हे अस्मानी संकट यामुळे हतबलता व्यक्त केली जात आहे. संभाव्य धोका बघता शिरोळ तालुक्यात व कोल्हापूर शहरात एनडीआरएफची पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.

‘भाजपा महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक आहे’