कोळंबकरांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला, ‘या’ दिवशी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप सेनेत पक्षांतर कण्याचा धडाका लावला आहे. तर कॉंग्रेसमध्ये सात वेळा आमदार राहिलेले कालिदास कोळंबकर येत्या मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे राज्यात निवडणुकी आधीच कॉंग्रेस – राष्ट्रवादीचं अस्तित्व धोक्यात आले आहे.

कालिदास कोळंबकर हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा अनेक दिवस सुरु होत्या. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कालिदास कोळंबकर यांनी आपल्या पक्षांतराचा मुहूर्त काढला आहे. येत्या मंगळवारी कोळंबकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश करणार आहेत. मुंबईतील गरवारे क्लबमध्ये कोळंबकर पक्षप्रवेश करणार असून यावेळी अजून काही जणांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे समजते.

दरम्यान कालिदास कोळंबकर हे वडाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. या मतदारसंघातून ते सातवेळा निवडून आले आहेत. 2014 च्या निवडणुकीत देशात आणि राज्यात मोदीलाट असतानाही कोळंबकर यांनी कॉंग्रेसला विजय मिळवून दिला. याआधी पाचवेळा ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. 2005 मध्ये नारायण राणे यांनी शिवसेनेपासून फारकत घेतली तेव्हा कोळंबकर यांनीही राणेंसोबत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता.