डावखरे – आव्हाड वादाचा दुसरा अध्याय; निरंजन डावखरेंना आव्हान देणार आव्हाडांचा पठ्या

टीम महाराष्ट्र देशा: पक्षाअंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून आमदार निरंजन डावखरे यांनी मागील आठवड्यात राष्ट्रवादीला रामराम ठोकला होता, डावखरे यांनी राष्ट्रवादी सोडताच भाजपने त्यांना प्रवेश देत कोकण पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी देखील जाहीर केली.

दरम्यान, आता डावखरे आणि आव्हाड वादाचा दुसरा अध्याय पहायला मिळणार आहे. कारण निरंजन डावखरेंच्या विरोधात जितेंद्र आव्हाड यांचे खंदे समर्थक नजिब मुल्ला यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नजीब मुल्ला यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी निश्चित मानली जात असून केवळ अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी आहे.

ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्याकडून केल्या जाणाऱ्या राजकारणामुळे कै वसंत डावखरे आणि यांचे पुत्र निरंजन नाराज होते, जून २०१६ मध्ये झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत वसंत डावखरे यांना हार पत्करावी लागली होती, स्थानिक राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्यांनी मदत न केल्यामुळे पराभूत झाल्याचा राग डावखरे यांच्या मनामध्ये होता. दरम्यान, 4 जानेवारी रोजी आजाराने वसंत डावखरे यांचे निधन झाले, वडिलांच्या निधनानंतर कायम आपल्याला दुय्यम वागणूक दिली गेल्याचा आरोप निरंजन डावखरे यांच्याकडून करण्यात आला होता. यातूनच त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला.

निरंजन डावखरे यांना भाजपकडून कोकण पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली आहे. तर आता त्यांच्या विरोधात जितेंद्र आव्हाड यांच्या कट्टर समर्थकाला उमेदवारी देण्यात येणार असल्याने थेट डावखरे आव्हाड सामना पहायला मिळणार आहे.

You might also like
Comments
Loading...