पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेणे म्हणजे राजकारण करणे नव्हे : शरद पवार

sharad pawar and devendra fadnvis

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात  पडणाऱ्या सततच्या मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. या पुरामध्ये अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे. या पूरग्रस्तांना राज्यसरकार सर्वतोपरी मदत करत आहे.

याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीत पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी बोलताना फडणवीस यांनी ‘मुसळधार पाऊस, कोयनेतील विसर्गामुळे पूरग्रस्तस्थिती निर्माण झाली. सांगली आणि कोल्हापूरमधील जनजीवन पूर्वरत करण्यावर सध्या सरकारने भर दिला आहे. विरोधकांनी पूरस्थितीचं राजकारण करू नये. सर्वांनी एकत्र येऊन लोकांना मदत करावी. सरकारच्या उणिवा दाखवून द्या पण राजकारण करू नका अस आवाहन विरोधकांना केले आहे होते.

याला शरद पवार यांनी उत्तर देताना ‘मुख्यमंत्री म्हणत आहेत की, राजकारण करू नका. पण, हे काही राजकारण नाही. पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेणे म्हणजे राजकारण करणे नव्हे, हे राज्य सरकारला सांगण्याची वेळ आली आहे. पूरग्रस्तांना दहा-पंधरा हजार रुपयांची मदत देण्याऐवजी त्यांना विश्वासात घेऊन चांगली घरे बांधून देणे महत्त्वाचे आहे असं शरद पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्य सरकारतर्फे पूरग्रस्तांना १५४ कोटी रुपयांचा निधी मदत म्हणून देण्यात येणार आहे. हा निधी मृत व्यक्तींचे परिवार, जखमी तसेच पूरग्रस्तांना देण्यात येणार असल्याची माहिती सरकारतर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे या बाधित नागरिकांना सरकारच्या आर्थिक मदतीमुळे झालेलं नुकसान भरून काढण्यास मदत होणार आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसही सर्व आमदार, खासदार यांचा एक महिन्याचा पगार व लोकवर्गणीतून जमा झालेला ५० लाखाचा निधी पूरग्रस्तांना देणार आहे.