शाही शपथविधी : जाणून घ्या उद्धव ठाकरे कुमारस्वामींच्या शपथविधीला का राहणार अनुपस्थित ?

टीम महाराष्ट्र देशा- कर्नाटकातील नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर आता जेडीएसचे कुमारस्वामी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीला विरोधकांकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून देशभरातील नेते बंगळूरुला येणार आहेत. दरम्यान, कुमारस्वामी यांनी फोनकरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील शपथविधी सोहळ्याला आमंत्रित केल्याच्या बातम्या माध्यमांमधून येऊ लागल्या नंतर ठाकरे यांच्या उपस्थितीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होत. मात्र पालघर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असल्यानं उद्धव ठाकरे शपथविधी सोहळ्याला जाणार नाहीत अशी माहिती समोर येत आहे.

जेडीएसचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांनी मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख यांना फोन करुन शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण दिलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेगौडा यांचं अभिनंदन केलं. मात्र पालघर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत असल्यानं आपण शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहू शकत नसल्याचं उद्धव यांनी देवेगौडा यांना सांगितलं. याबद्दल त्यांनी देवेगौडा यांच्याकडे दिलगिरीदेखील व्यक्त केली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही याबद्दल भाष्य करत देवेगौडा यांना शुभेच्छा दिल्या. ‘उद्धव ठाकरे सध्या प्रचारात व्यस्त आहेत. त्यामुळे निमंत्रण असूनही ते शपथविधी सोहळ्याला जाऊ शकणार नाहीत. मात्र त्यांनी देवेगौडा यांना शुभेच्छा दिल्या आहेत,’ असं राऊत म्हणाले.

You might also like
Comments
Loading...