मेगाभरतीत कचरा आला! गंभीर आरोप करत राज्यमंत्र्याने सोडली कमळाची साथ

blank

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आतापर्यंत अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे तर अनेक नेते भाजप आणि शिवसेनेच्या वाटेवर आहेत. परंतु आता भाजपला मोत्गा धक्का बसला आहे. कारण राज्य मंत्रीपदाचा दर्जा असलेले शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी भाजपची साथ सोडली आहे.

किशोर तिवारी यांनी आता शिवसेनेसाठी काम करणार आहे अशी माहिती दिली आहे. भाजपमध्ये मेगाभरती झाली, पण कचरा आला आहे. मुख्यमंत्री सोडल्यास भाजपचे नेते प्रामाणिकपणे काम करत नाहीत, मला विधानपरिषद आमदार करण्याचा शब्द भाजपने पाळला नाही. त्यामुळे भाजपपासून लांब जातोय, आता शिवसेनेसाठी काम करणार असं विधान केले आहे.

पुढे बोलताना त्यांनी शिवसेनेनं संधी दिल्यास मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास आपण तयार आहोत असंही विधान केले आहे म्हणून तिवारी यांनी भाजपला सोडचिट्ठी देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवल्याने भाजपला हा दुहेरी धक्का बसला आहे.

दरम्यान, यापूर्वीही विदर्भातून भाजपला धक्का बसला होता. भाजपचे माजी आमदार विजय घोटमारे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत आघाडीचे नव्हे तर युतीचेही टेन्शन आता वाढले आहे.