राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं…

blank

टीम महाराष्ट्र देशा : येत्या २३ जानेवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या अधिवेशनात ध्वज आणि राजकीय भूमिकेबाबत मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आणि प्रसारमाध्यमांमध्ये रंगली आहे. राज्यातील सध्याच्या बदललेल्या सत्तासमीकरणांचा लाभ घेऊन पक्षाचे मुळापासून नवनिर्माण करण्याची योजना राज ठाकरे यांनी आखली आहे. त्याचाच भाग म्हणून मनसेच्या ध्वजाचा रंग आता पूर्णपणे बदलणार असून, भगव्या रंगातील मनसेच्या नव्या ध्वजाचे अनावरण होण्याची शक्यता आहे.

तसेच भगव्या ध्वजासोबतच राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष आक्रमक हिंदुत्वाची कास पकडण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे. पण ही हिंदुत्वाची वाट मनसेला सत्तेच्या ‘राज’मार्गावर आणणार? का असा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत आहे.

सध्या राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीचे समीकरण निर्माण झाले आहे. त्यातही शिवसेना एकेकाळचे कट्टर शत्रू असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेल्याने राज्यातील राजकारणात पोकळी निर्माण झाली असून, या संधीचा लाभ घेऊन हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचून पक्षाची वाढ करण्याचा राज ठाकरे यांचा मानस आहे.

यासंदर्भातच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला जोरदार टोला लगावला आहे. एक भाऊ सत्तेसाठी सगळे सिद्धांत सोडत आहे तर दुसरा भाऊ बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात येत असेल तर त्याचं स्वागत आहे. अशी प्रतिक्रिया सोमय्या यांनी दिली आहे. तर सत्तेमुळे शिवसेना हिंदुत्व विसरली असल्याचा टोला सुद्धा सोमय्या यांनी लगावला आहे.