‘किरीट सोमय्या बिल्डरांसाठी काम करतात, त्यातून त्यांच्या संस्थेला निधी मिळतो’

kirit somyya

मुंबई : मुकेश दोषी यांची क्रिस्टल प्राइड आणि आनंद पंडित यांची लोटस डेव्हलपर्स या बिल्डरांसाठी भाजपा नेते किरीट सोमय्या हे काम करत आहेत. या बिल्डरांकडून सोमय्या यांच्या संस्थेला मोठा निधी मिळत असल्याचा गंभीर आरोप अर्थ या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण कलमे यांनी केला. यावर माहिती देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.

गृहनिर्माण विभाग, एस आर ए, म्हाडा या संस्थांमध्ये काम करणाऱ्या बिल्डरांकडून १ हजार कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश सध्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रवीण कलमे यांना दिले आहेत. कलमे हे या सरकारी संस्थांमधील सचिन वाझे आहेत. असे आरोप सोमय्या यांनी १ एप्रिल रोजी केला होता.

याबाबत कलमे म्हणाले की, या आरोपांना आव्हान देत आपल्या अर्थ या स्वयंसेवी संस्थेने शिवडीच्या महानगर दंडाधिकारी न्यायालयात सोमय्या यांच्या विरोधात दावा दाखल केला होता. सोमय्या यांनी अब्रूनुकसानीचे कृत्य केले आहे. असे प्रथमदर्शनी दिसून येत आसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. तसेच भारतीय दंड संविधान ५०० अंतर्गत दंडनीय गुन्ह्याची सुनावणी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.’

नेते आणि मंत्री यांच्यावर आरोप करणारे सोमय्या आपल्या जवळच्या बिल्डर मित्रांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शांत आहेत. मुंबईतील शेकडो इमारती नियमबाह्य पद्धतीने उभारलेल्या आहेत. त्याविरोधात आपल्या संस्थेने ६८ माहिती अधिकाराचे अर्ज टाकले आहेत. एवढेच नाही तर यावर कारवाई करण्यासाठी वारंवार पत्रव्यवहारही केल्याचे कलमे यांनी यावेळी सांगितले.

सोमय्यांचा आरोप काय?
दोन महिन्यांपूर्वी किरीट सोमय्या यांनी प्रवीण कलमे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ‘जितेंद्र आव्हाड यांच्या आशीर्वादाने एसआरए, म्हाडा, महापालिकेमध्ये १०० बिल्डरची यादी, १०० आरटीआय, मंत्री महोदयांचे आदेश घेऊन प्रविण कलमे नावाचा व्यक्ती हा आव्हाडांचा राईट हँड गेले काही महिने वसुली गँग चालवत आहे. आव्हाड यांचे वाझे म्हणजे प्रविण कलमे हे महापालिका, म्हाडा, एसआरए मध्ये १०० बिल्डर्सच्या विरोधात १०० आरटीआय करतात. त्यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड त्वरित अहवाल सादर करावा असे आदेश देतात. लगेच एसआरए असो, म्हाडा असो यांचे ‘वसुली गँग’चे अधिकारी कामाला लागतात.’ असा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.

महत्वाच्या बातम्या