किराडपुऱ्यातील मनपाचे बालवाडी केंद्र बनले जुगाऱ्यांचा अड्डा! मनपा प्रशासनाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर

औरंगाबाद : नुकतेच महापालिकेच्या कबीरनगर येथील आरोग्य केंद्रांत तळीरामांचा खेळ सुरू असल्याच्या प्रकारातून मनपाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. मात्र शहरात अजूनही अनेक ठिकाणी सर्रासपणे असे प्रकार सुरु असून मनपा आणि जिल्हा प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे किराडपुऱ्यातील बंद असलेली मनपाच्या अंगणवाडी, बालवाडी केंद्राची इमारत गेल्या दिड वर्षांपासून नशेबाज आणि तळीरामांचा अड्डा बनली आहे. याठिकाणी १५ वर्षांपासूनची मुले व्हाईटनर, गांजा, अफू, विविध पुड्यांचे सेवन करतात. त्यामुळे केंद्रात मोठ्या प्रमाणावर कचरा साठला आहे.

किराडपुरा भागात १० वर्षांपासून मनपाच्या मालकीची शाळा आहे. सध्या याठिकाणी अंगणवाडी केंद्र चालवले जाते. मात्र पूर्वी याच इमारतीत मनपाची शाळा होती. काही वर्षांपूर्वी या बाजूलाच नवीन शाळेच्या बांधकामानंतर शाळेचे वर्ग नवीन इमारतीत सुरु करण्यात आले. तसेच जुन्या इमारतीला या भागातील लहान बालकांसाठी अंगणवाडी केंद्र म्हणून घोषित करण्यात आले. गतवर्षी कोरोना विषाणूच्या आगमनानंतर शहरात लॉकडाऊन, संचारबंदी लागू करण्यात आली. तेव्हापासून शहरातील शाळा बंद स्वरुपातच आहेत. मात्र या संधीचा फायदा घेत किराडपुऱ्यातील या मनपाच्या इमारतीत या भागातील टवाळखोरांनी आपला हक्काचा अड्डा बनवला आहे.

याठिकाणी दिवसभर १०० ते दिडशे जणांचे टोळके वेगवेगळ्या भागात, खोल्यांमध्ये बसून असतात. हि स्लम वसाहत असल्याने बेरोजगार तरुणांची संख्या याठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. यांना वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन असल्याने आपले व्यसन पूर्ण करण्यासाठी हि इमारत त्यांची हक्काची जागा झाली आहे. मात्र येथील साहित्य जसे बाक, फळे इतर साहित्यांची नासधूस देखील झाल्याचे स्पष्ट होत आहे. या केंद्राचा वापर काही मंडळी गैरकृत्यासाठी करीत असल्याचे एकूण परिस्थितीवरुन निदर्शनास आलेे. येथे रात्रीच्या वेळेस ओल्या पार्ट्या देखील रंगत असल्याचे दारुच्या रिकाम्या बाटल्यांवरुन समजते.

माहिती घेऊन सांगतो

याठिकाणी सुरु असलेल्या प्रकाराविषयी ‘महाराष्ट्र देशा’ने मनपाचे शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी येथील संबंधित मुख्याध्यापक, शिक्षकांकडून माहिती घेऊन सांगतो. अशी प्रतिक्रिया दिली. ‘महाराष्ट्र देशा’ने संपर्क केल्यानंतर प्रशासनाने हालचाली सुरु केल्या असून वॉर्ड अधिकाऱ्यांना पत्र दिल्याची माहिती थोरे यांनी दिली. तसेच या प्रकारावर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावरुन येथील एकूणच प्रकाराविषयी आत्तापर्यंत मनपा प्रशासन अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.

महत्त्वाच्या बातम्या

IMP