पद्मविभूषणसाठी दिलेली खाशाबा जाधवांची फाईल बेपत्ता

अभिजित कटके

नागपूर : राज्यासह देशाच्या क्रीडा जगतात वेगळे स्थान असलेले कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा पद्मविभूषणने सन्मान व्हावा यासाठी शासनाकडे दिलेली फाईल गहाळझाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.यासंदर्भात हाती आलेल्या अधिकृत माहितीनुसार खाशाबा जाधव यांनी पद्मविभूषण मिळवे यासाठी पावसाळी अधिवेशनात त्यांच्या कुटुंबियांनी क्रीडामंत्री विनोद तावडेंची भेट घेतली होती. त्यावेळीतावडे यांनी जाधव कुटुंबियांना आश्वासनही दिले होते.

या सन्मानासाठी सप्टेंबर महिन्यापर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे क्रमप्राप्त होते. परंतु, ती प्रक्रिया करण्यातच आली नाही. याबाबत खाशाबांचे पुत्र रणजित जाधव यांनी क्रीडा विभागाकडे विचारणा केली असता, संबंधीत फाईल गहाळ झाल्याचे सांगण्यात आले.

हे प्रकरण भाजप खा. रामदास तडस यांच्याकानावर गेले असता त्यांनी संपूर्ण प्रकार मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातला. हे सर्व ऐकल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी बोलून पद्मविभूषणसाठी तत्काळ शिफारस करण्याची ग्वाही दिली. खाशाबा जाधव यांचा जन्म 15 जानेवारी 1926 रोजी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातल्या गोळेश्वर गावात झाला. त्यांनी 1952 साली हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये फ्रीस्टाइल कुस्तीत जिंकलेलं कांस्यपदक हे भारताला स्वातंत्र्योत्तर काळात मिळालेलं पहिलं वैयक्तिक पदक होतं.

1948 मध्ये लंडन ऑलिंपिकमध्ये फ्लायवेट वजन गटातील कुस्तीत सहावा क्रमांक मिळवला होता. भारत सरकारने पद्म पुरस्काराने सन्मानित न केलेले ते एकमेव ऑलिंपिक पदक विजेते आहेत.