खंडोबाराया आगामी निवडणुकीत भाजपाचा खेळखंडोबा केल्याशिवाय राहणार नाही – सक्षणा सलगर

टीम महाराष्ट्र देशा – सत्तेत नसताना धनगर समाजाचा भाजपाला पुळका होता. धनगर समाजाला आरक्षण देणार,असे सांगत भाजपाने सत्ता काबीज केली़, मात्र गेल्या चार वर्षांत भाजपा सरकारने धनगरांची उपेक्षाच केली. तुम्हाला धनगर समाजाने आरक्षणासाठी मते दिली होती़, पण तुम्ही धनगर समाजाचा विश्वासघात केला, माळेगावचा जागृत खंडोबाराया तुम्हाला कधीच माफ करणार नाही, अशी आक्रमक तोफ डागत धनगर समाजाच्या आक्रमक नेत्या आणि राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी धनगर आरक्षणावरून भाजपा सरकारला लक्ष्य केले.

श्रीक्षेत्र माळेगाव येथील खंडोबारायाच्या यात्रेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित धनगर आरक्षण ललकार महामेळाव्यात त्या बोलत होत्या. भाजपाने धनगर समाजाचा विश्वासघात केल्याने श्रीक्षेत्र माळेगाव येथील खंडोबाराया येणाऱ्या निवडणुकीत भाजपाचा खेळखंडोबा केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.