खडसे मंत्रिमंडळातून बाहेर गेले आणि मुंडे साहेबांच्या स्मारकाचा विषयच बारगळला !

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी राज्यसरकारने १०० कोटी रुपये मंजूर केल्यानंतर आता राज्यात रखडलेल्या दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचा विषय जोर धरू लागला आहे. या मागणीसाठी आता मुंडे समर्थक आक्रमक झाले असून हे स्मारक बांधा अन्यथा आत्मदहन करु, तर येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक प्रचारात गोपीनाथ मुंडे यांच फोटो आणि नाव देखील वापरू देणार नाही ” असा इशारा भगवान महासंघाचे बाळासाहेब सानप यांनी दिलाय.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी महसूलमंत्री असताना फेब्रुवारी 2015 मध्ये स्मारकाची घोषणा केली होती. शहरातील हॉटेल अमरप्रीतच्या समोरच्या बाजूला शासकीय दूध डेअरीला भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या जागेत हे स्मारक केलं जाणार होतं. याबाबतचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर ठेवण्यात येईल, असंही खडसे म्हणाले होते. सरकारच्या सहा एकर जागेपैकी दोन एकर जागेत हे स्मारक उभे करण्यासाठी आराखडा तयार केला जाणार होता. त्याच्या सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केली असल्याचंही खडसेंनी सांगितलं होतं.

तीन महिन्यांत हा आराखडा तयार होणार असून तेथे एक उद्यानही व्हावे, असा प्रयत्न असल्याचं चार वर्षांपूर्वी खडसे म्हणाले होते. या उद्यानात गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा, त्यांनी वापरलेल्या वस्तू आणि पुस्तकांचे संग्रहालय, त्यांनी लिहिलेले लेख येथे ठेवले जाणार होते. मुंडेंच्या आयुष्यावरील लघुपट दाखवण्यासाठी 100 आसनक्षमतेचं एम्पी थिएटरही उभारलं जाणार असल्याचं सांगितलं होतं.

एकनाथ खडसे यांनी ज्या तत्परतेने स्मारकासाठी जागा उपलब्ध करुन दिली, तेवढी तत्परता फडणवीस सरकारने निधी देण्यासाठी दाखवली नाही. खडसे यांनी राजीनामा दिल्यानंतर या स्मारकाचं कामही मागे पडलं. आता मुंडे समर्थक यासाठी आक्रमक होत आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत हा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.