खडसेंचा अंजली दमानियांविरोधात खटला

जळगाव : ट्विटरवर बदनामी केल्या प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांच्या विरुध्द जळगाव न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला. खटला दाखल झाल्यामुळे अंजली दमानिया यांच्या अडचणी आणखी वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

खड्सेंवर विविध भ्रष्टाचाराचे जे आरोप करण्यात आले होते ते आरोप करण्यात अंजली दमानिया या सर्वात आघाडीवर होत्या. याच आरोपांमुळे खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. तेंव्हापासून खडसे विरुध्द दमानिया हा वाद दिवसेंदिवस वाढत आहे. भारतीय दंडविधान ५०० प्रमाणे मानहानीचा फौजदारी खटला न्यायालयात सादर करण्यात आल्याची माहिती खडसे यांचे कायदेशिर सल्लागार अॅॅड. प्रकाश पाटील यांनी दिली.

न्यायालयातून आपल्याविरूद्ध लढा द्यावा, असे अंजली दमानिया यांनी म्हटले होते. त्यांनी सांगितल्यानुसार आपण त्यांच्याविरूद्ध लढा देण्यासाठी न्यायालयात आलो असल्याचे खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.