‘महाराष्ट्र बंद करायला निघालेल्या ठाकरे सरकारला लातूरमध्ये अन्नत्याग आंदोलन करणारे शेतकरी दिसत नाहीत का ?’

'महाराष्ट्र बंद करायला निघालेल्या ठाकरे सरकारला लातूरमध्ये अन्नत्याग आंदोलन करणारे शेतकरी दिसत नाहीत का ?'

मुंबई – उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी महाराष्ट्र बंद करायला निघालेल्या ढोंगी ठाकरे सरकारला लातूरमध्ये 72 तास अन्नत्याग आंदोलन करणारे 72 शेतकरी दिसत नाहीत का, असा खोचक सवाल प्रदेश भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

अतिवृष्टी आणि महापुरासोबतच मानवनिर्मित संकटामुळे उद्ध्वस्त झालेल्या मराठवाड्यातील शेतकरी आज अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. लातूर येथे मांजरा धरणाचे पाणी चुकीच्या पद्धतीने सोडल्यामुळे पाऊस थांबल्यानंतरही असंख्य शेतक-यांच्या शेतात पाणी शिरले. त्यातून सोयाबीन सारखी पिके उद्ध्वस्त झाली. या शेतक-यांना कोणत्याही प्रकारची मदत सरकारकडून मिळालेली नाही. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 72 शेतकरी 72 तासांसाठी अन्नत्याग आंदोलनाला बसले असून पंचक्रोशीतील गावांनी चूल बंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला हजारो गावकरी पाठिंबा देण्यासाठी जमत असून भारतीय जनता पार्टीचे आमदार संभाजी पाटील तसेच रमेश कराड हे उपस्थित आहेत.

एकिकडे शेतक-यांना शेतकरी प्रेमाचे उमाळे दाखवणारे काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या एकाही नेत्याने या गावक-यांना भेटण्याचे सौजन्यही दाखवले नाही. तसेच लातूरला अतिवृष्टीला मिळालेली मदत ही शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसणारी ठरली आहे.

लातूरसारखाच महाराष्ट्रातला शेतकरी हलाखीने त्रस्त असताना, हाताची घडी घालून व सर्वसामान्य जनतेस वेठीस धरून उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यास पाठिंबा देणाऱ्या सरकारने लखीमपूर दुर्घटनेचेही राजकारण सुरू केले आहे, असा आरोप त्यांनी केला. बळाचा, सरकारी यंत्रणेचा आणि सरकारच्या आशीर्वादाने गुंडगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा वापर करून बंदमध्ये सहभागी होण्यासाठी जनतेत दहशत माजवू पाहात असून या बंदला जनतेचा तीव्र विरोध असल्याचे सकाळपासूनच्या अनेक घटनांतून स्पष्ट झाले आहे, असे ते म्हणाले.

लातूरमध्ये ७२ शेतकरी अन्नत्याग आंदोलन करत आहेत आणि शेकडो घरांमध्ये चूल बंद आंदोलन सुरू आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या या आंदोलनाकडे पाठ फिरवून उत्तर प्रदेशातील घटनेवर बेगडी सहानुभूती दाखविणाऱ्या ढोंगी सरकारचे राजकारण उघडे पडले आहे, असे उपाध्ये म्हणाले.

महत्वाच्या बातम्या