fbpx

अक्षयकुमारच्या ‘केसरी’चा सेट जळून खाक

टीम महाराष्ट्र देशा- साताऱ्यात सुपरस्टार अक्षयकुमारच्या ‘केसरी’ सिनेमाच्या शूटिंग दरम्यान सेटवर आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून अक्षयकुमारसह सर्वजण सुखरुप आहेत.

साताऱ्यात पिंपोडे बुद्रुक गावामध्ये अक्षयकुमारच्या ‘केसरी’ सिनेमाचं शूटिंग सुरु आहे. अक्षयकुमार ट्विटरवर आपले लूकही पोस्ट करत आहे. अक्षयकुमारचा आगामी सिनेमा केसरीचं साताऱ्यातील पिंपोडे बुद्रुक गावात शुटिंग सुरू आहे. सिनेमाच शुटिंग सुरू असताना अचानक सेटला आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली. या आगीत सेट जळून खाक झाला. या आगीत कॅमेरे आणि इतर साहित्य जळून खाक झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेटवर एका बाॅम्बस्फोटाचं शुटिंग सुरू होतं. या दरम्यान सेटवर ठेवण्यात आलेल्या काही वस्तूंवर स्फोटानंतर आगीचे गोळे उडाले. त्यामुळे आग लागली. केसरीच्या क्लायमेक्सचं शुटिंग सुरू होतं.

केसरी हा चित्रपट साराग्रहींच्या लढ्यावर आधारित आहे. अक्षयकुमार सोबत अभिनेत्री परीणिती चोप्रा या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. पुढच्या वर्षी होळीच्या मुहूर्ता केसरी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.दरम्यान काहीच दिवसांपूर्वी केसरी चित्रपटाच्या सेटवर एक स्टंट करत असताना अक्षयला दुखापत झाली होती. यानंतर अक्षयवर उपचारही करण्यात आले होते. डॉक्टरांनी अक्षयला विश्रांतीचा सल्ला दिला होता.