पथारी व्यावसायिकांनी जपले सामाजिक भान !

पुणेः- केरळमधील जलप्रलयामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबियांसाठी मदत म्हणून सामाजिक जाणीवेचे भान ठेवत येथील शिवराय विचार पथारी संघटनेतर्फे पथारी व्यावसायिकांच्या स्वकमाईतून केरळमधील सुमारे शंभर पूरग्रस्त कुटुंबांना कपडे पाठविण्यात येणार आहेत. या मदतीचे स्वरुप अधिक व्यापक करण्यासाठी शिवराय विचार पथारी संघटनेतर्फे आज शिवराय विचार पथारी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र (अण्णा) माळवदकर यांच्या नेतृत्वाखाली मदत फेरी काढण्यात आली.

गुरुजी तालीम मंदिरापासून या मदत फेरीचा प्रारंभ झाला. तेथून लक्ष्मी रस्ता, शगुन चौक मार्गे मंडईतील लोकमान्य पुतळयाजवळ या रॅलीचा समारोप झाला. या मदत रॅलीमध्ये रोख रक्कम, कपडे आणि अन्य जीवनावश्यक वस्तू स्वीकारण्यात आल्या. यावेळी लक्ष्मी रोड परिसरातील नागरिकांसह व्यापाऱ्यांनी देखील विविध स्वरूपात मदत केली. ही सर्व मदत पुणे येथील एफ.टी.आय.आय अर्थात फिल्म ॲन्ड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये केरळच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या मदत केंद्राकडे सुपूर्त करण्यात येणार आहे.