डाव्यांच्या बॅनर्सवर हुकूमशाह किम जोंग उन यांची छायाचित्रे

किम जोंग उन डाव्यांचे नवे हिरो ?

तिरूअनंतपुरम: जगभरात दहशत निर्माण करण्यासाठी किम जोंग उन निरनिरळ्या अणुचाचण्या घेत आहे. हे प्रकार रोखण्यासाठी अमेरिका वारंवार प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर केरळमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या बॅनर्सवर उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांची छायाचित्रे झळकली आहेत. येथील इडुक्की जिल्ह्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रादेशिक स्तरावरील परिषदेच्या प्रचारासाठी हे बॅनर्स लावण्यात आले होते. मात्र, ही परिषद संपून दोन दिवस उलटल्यानंतरही हे बॅनर्स तसेच ठेवण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे.

केरळमधील इडुक्की जिल्ह्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रादेशिक स्तरावरील परिषदेच्या प्रचारासाठी किम जोंग उन यांचे छायाचित्रे असलेले बॅनर्स लावण्यात आले होते. मात्र, ही परिषद संपूनही हे बॅनर्स काढण्यात आले नाहीत. त्यामुळे याविषयीची चर्चा सगळीकडे सुरु आहे. इडुक्की येथील सीपीएमचे सचिव के.के. जयचंद्रन यांनी म्हटले की, किम जोंग उन हे अमेरिकेला आव्हान देणारे एकमेव साम्यवादी नेते असल्याची भावना आमच्या काही कार्यकर्त्यांमध्ये आहे. मात्र, पक्षाची ही अधिकृत भूमिका नाही. त्यामुळे आम्ही स्थानिक पदाधिकाऱ्यांना हे बॅनर्स काढून टाकण्याचे आदेश दिले होते आणि त्याची अंमलबजावणीही झाली होती. केवळ पॅम्पादुम्पारा या गावातील एक बॅनर उतरवण्यात आला नव्हता. त्यानंतर आम्ही तेथील नेत्यांना तत्काळ आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिल्याचे जयचंद्रन यांनी सांगितले.