fbpx

एक दिवस इंदिराजींसारख मला देखील मारून टाकतील, केजरीवालांना वाटते भीती

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्यातील प्रचाराची शुक्रवारी सांगता झाली असून तापलेले राजकीय वातावरण आता थंड होऊ लागले आहे. तर त्यातच आता दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी माझी इंदिरा गांधींप्रमाणे हत्या होऊ शकते, असे खळबळजनक वक्तव्य केले आहे. एका वृतपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

या मुलाखतीत केजरीवाल म्हणाले की, देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याप्रमाणेच माझा ‘पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर’ (पीएसओ) माझी हत्या करू शकतो, माझं आयुष्य दोन मिनिटांत संपू शकतं. कारण माझ्या अवतीभवती जे सुरक्षारक्षक आहेत, ते सगळे भाजपाला रिपोर्ट करतात. भाजपाचे नेते माझ्या ‘पीएसओ’करवी मला ठार मारू शकतात. माझ्या जिवाला त्यांच्यापासूनच धोका आहे, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय.

याआधी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आपली हत्या करवू शकतात, असा दावा केजरीवाल यांनी २०१६ मध्ये केला होता. तर सुरक्षारक्षकांचं कवच असतानाही केजरीवाल यांच्यावर सहा वेळा हल्ला झाला आहे. परंतु, याबाबत केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई केल्याच दिसत नाही.